ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाऱ्या ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 02:52 PM2018-08-14T14:52:09+5:302018-08-14T14:53:50+5:30
ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाºया ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना यंदापासून कात्री लागणार आहे. या पुरस्कांसाठीची नियमावली पालिकेने तयार केली आहे. आता ती महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.
ठाणे - ठाणे भुषण, ठाणे गौरव, आणि गुनीजन पुरस्कारांना आता यंदापासून महापौरांनी चपराक लावण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार आता ठाणे महापालिकेने या पुरस्कारांची नव्याने नियमावली तयार केली असून होलसेलमध्ये दिल्या जाणाºया पुरस्कारांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
येत्या २० आॅगस्ट रोजी होणाºया महासभेत हा विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने १ आॅक्टोबर रोजी महापालिकेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा, शैक्षणिक, वैज्ञानिक, नाविन्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरातील नागरीकांना अशा प्रकारे विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. परंतु मागील काही वर्षात या पुरस्कारांचे स्वरुप फारच खालच्या पातळीवर गेले होते. अगदी नगरसेवकाच्या लेटरहेडवर अनेकांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरल्याचे दिसून आले आहे. परंतु मागील वर्षी या पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस झालेल्या सावळ्या गोंधळा नंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या पुरस्कारांची संख्या कमी करतांनाच, पुरस्कार देतांना काही महत्वाचे निकष असावेत असे स्पष्ट करीत त्यानुसार नियमावली तयार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आता प्रशासनाने नियमावली तयार केली आहे.
या नियमावलीनुसार ठाणे भुषण पुरस्काराची संख्या ही आता केवळ एक वर आली आहे. यासाठी नियमावली तयार करतांना सदरची व्यक्ती ठाणे शहराची नागरीक असावी, शहरात १५ वर्षे वास्तव्य असावे, त्याचे वय ६० वर्षापेक्षा कमी असू नये, गुन्हा दाखल नसावा, सामाजिक, क्रिडा किंवा सांस्कृतिक क्षेत्रात सदर व्यक्तीने किमान सात वर्षे योगदान दिलेले असावे, या पुरस्कारासाठी खासदार, आमदार किंवा प्रभागातील नगरसेवकाचे शिफारस पत्र असणे आवश्यक असणार आहे. तर ठाणे गौरव पुरस्काराची संख्या सुध्दा आता सीमीत करतांना ती १५ वर आणण्यात आली आहे. या पुरस्कारासाठीसुध्दा अशाच स्वरुपाचे काही नियम असणार आहेत. तसेच ठाणे गुणीजन पुरस्कारांची संख्या ही ७० असणार आहे. त्यानुसार आलेल्या अर्जांची छाननी ही सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीला या आधी गुणीजन पुरस्कार प्राप्त झाला असेल अशा व्यक्तांनी तो पुरस्कार कोणत्या साली दिला, त्यानंतर त्या व्यक्तीने कोणते उल्लेखनीय असे लोककल्याणकारी कार्य केले आहे, याचे मुल्लमापन केले जाणार आहे. तर सर्व पुरस्कारांसाठी महापौरांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे.