ठाण्यात भाजपाच्या नशिबी वनवास!

By admin | Published: February 24, 2017 07:39 AM2017-02-24T07:39:01+5:302017-02-24T07:39:01+5:30

मुंबईत अपेक्षित बहुमत मिळाले नसले, तरी ठाण्यात मात्र शिवसेनेने ६७ जागा मिळवून निर्विवाद बहुमताचा

Thane BJP's destitute exile! | ठाण्यात भाजपाच्या नशिबी वनवास!

ठाण्यात भाजपाच्या नशिबी वनवास!

Next

नारायण जाधव / ठाणे
मुंबईत अपेक्षित बहुमत मिळाले नसले, तरी ठाण्यात मात्र शिवसेनेने ६७ जागा मिळवून निर्विवाद बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. गेल्या वेळी आठ जागा मिळवणाऱ्या मित्रपक्ष भाजपाने या वेळी इतर पक्षांतून आलेल्या आयारामांच्या जीवावर २३ जागांवर यश मिळवून आपली ताकद वाढवली असली, तरी सत्तासोपानाच्या राजकारणात त्यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याने शिवसेनेकडून सापत्न वागणूक दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत. ‘सबसे पुराना दोस्त आता सबसे बडा दुश्मन’ झाला असून गेर्ली २५ वर्षे शिवसेनेचा हात धरून महापालिकेत सत्तेची जी चव भाजपाने चाखली ती आता त्यांना चाखता येणार नाही.तर आघाडीने एकत्र लढल्यास आणि नेत्यांनी मतभेद विसरून मैदानात उतरल्यास ते शिवसेनेला टक्कर देऊ शकतील, असा संदेश या निवडणुकीने दिला आहे.
गेल्या वेळेस युती असूनही उपमहापौरपदासह स्थायी समितीपद देण्यासाठी शिवसेनेने भाजपाच्या चांगलेच नाकीनऊ आणले होते. आता तर बहुमत मिळाल्याने ठाण्यात शतप्रतिशत शिवसेना दिसते आहे. त्यातच, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तोडफोडीच्या राजकारणात भाजपाने शिवसेनेला चांगलेच छळले. शिवाय, राज्यातील सत्तेचा लाभ उठवून निवडणूक आयोगासह पोलिसांनाही आपल्या तालावर नाचवून शिवसेनेला जेरीस आणले होते. ते इतके की, मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदारयाद्या बदलण्याची हिम्मत दाखवली. शिवाय, भाजपातील गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांची माहिती मतदारांना होऊ नये, म्हणून तांत्रिक कारण दाखवून त्यांची शपथपत्रातील माहिती संकेतस्थळावर शेवटच्या टप्प्यापर्यंत लोड होऊ दिलेली नव्हती. शिवाय, आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ठाण्यातच प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला बालेकिल्ल्यातच आव्हान दिले. निवडणूक प्रचारकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन सभा घेऊन सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांचे खंडणीखोर आणि दलाल असे वर्णन करून मोठे आव्हान उभे केले. मात्र, तरीही मुख्यमंत्र्यांच्या या हेटाळणीला ठाण्याच्या खाडीत बुडवून गेली २५ वर्षे शिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या ठाणेकरांनी या वेळी बहुमताची जादुई फिगर गाठण्यासाठी आवश्यक असलेले नगरसेवक शिवसेनेचे निवडून दिले आहेत. गेल्या वेळी शिवसेनेचे ५३ नगरसेवक निवडून देणाऱ्या ठाणेकरांनी यावेळी इतर पक्षातील १५ आयारामरामांसह ६७ नगरसेवक निवडून दिले आहेत. यात राज ठाकरेंच्या मनसे आणि काँगे्रसला मोठा फटका बसला आहे. तर, मुंब्रा-कळवा भागात उल्लेखनीय यश संपादित करून राष्ट्रवादीची इज्जत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ३४ जागा मिळवून वाचवली आहे. तर, काँग्रेसला आपसातील मतभेदांमुळे अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले असून शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनाही पराभवाची चव चाखावी लागणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाण्यातील रामायणाची कथा सांगून राम-रावणाचे दाखले देऊन स्वपक्षात बाहेरून आलेल्यांना बिभीषणाची उपमा दिली होती. परंतु, यानंतरही ठाणेकरांनी भाजपाला बहुमतापासून चार हात लांब ठेवून वनवासात पाठवले आहे.
आता ज्याज्या भागात शिवसेनेला फटका बसला आहे, त्यावर लक्ष केंद्रित करून शिवसेना मार्गक्रमण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यात मुंब्रा-कळव्यासाठी विशेष योजना आखल्या जाणार असून घोडबंदर, जुने ठाणे शहरांकडेही लक्ष दिले जाणार आहे. यासाठी स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती, शिक्षण समितीसह वृक्ष प्राधिकरण समितीवर त्यात्या भागातील चांगल्या कार्यकर्त्यांना घेऊन या विजयाचे शिल्पकार असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आपली रणनीती ठरवणार असून पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर आणि खासदार राजन विचारे यांची चांगली मोट बांधण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहेत. सत्तासोपानात किंगमेकर ठरलेल्या दिवा विभागाकडे विकासकामांसाठी शिवसेना आता विशेष लक्ष देणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

एमआयएमचा उदय ही धोक्याची घंटा
ठाणे महापालिकेत काँगे्रसची ताकद तोळामासा असून त्या जोराने राष्ट्रवादीची ताकद मुंब्य्रातील मुस्लीम मतदारांच्या जोरावर वाढली आहे. याचे श्रेय आमदार जितेंद्र आव्हाड यांना द्यायलच हवे. त्यांनी येनकेनप्रकारे पक्षाची ताकद जिवंत ठेवली आहे. त्यामानाने काँगे्रसने सर्वच आघाड्यावंर मागे पडली आहे. शहरात एकही चांगले आंदोलन नाही, युतीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणे नाही. यामुळे काँगे्रेस दिवसेंदिवस कमजोर होत चालली आहे.

तसेच एमआयएमने १७ जागा दिल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर विजय झाला असली तरी १० जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे.
तू तू मै मै न करता काँगे्रस आणि राष्ट्रवादीने आपसातील मतभेद दूर ठेवून आपली व्होट बँक वाढविणे गरजेचे झालेले आहे, कोणता पक्ष
कोठे ताकदवार आहे, हे लक्षात घेऊन तसे उमेदवार दिल्यास त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होऊन आघाडीची ताकद वाढू शकते.

२५ जागांवर आयाराम
च्गेल्या वेळी आठ जागा जिंकणाऱ्या भाजपाने या वेळी २३ जागा जिंकून आपली ताकद वाढवली असली, तरी यात ९ ते १० जागांवर आयाराम जिंकले आहेत. शिवसेनेच्या ६७ जागांत १४ ते १५ आयाराम निवडून आले आहेत.
च्म्हणजे दोन्ही मिळून २५ आयारामांचा समावेश आहे.परंतु, जो जिता वही सिंकदर या प्रमाणे दोन्ही पक्ष आपापली पाठ थोपटून घेत असून निष्ठावंत मात्र बॅनर्स, पोस्टर्स लावत बसले आहेत.

Web Title: Thane BJP's destitute exile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.