ठाणे ते मंत्रालय धावणारी ठाणे परिवहनची बस अखेर होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:30 PM2018-02-02T17:30:25+5:302018-02-02T17:33:25+5:30
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असतांना आणि प्रवासी देखील नसतांना तोट्यात सुरु असलेली ठाणे (कॅडबरी) ते मंत्रालय ही टिएमटीची बस अखेर बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ठाणे - लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर सुरु करण्यात आलेली ठाणे ते मंत्रालय ही ठाणे परिवहनची सेवा अखेर होणाºया तोट्यामुळे आणि प्रवाशांची संख्या कमी झाल्याने बंद करण्याची वेळ परिवहन प्रशासनावर आली आहे. ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने सुरु केलेली ठाणे मंत्रालय हि बससेवा अखेर बंद करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक तसेच प्रवासीही या बसला नसल्याने शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही बससेवा बंद झाल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी वातानुकूलित नसलेल्या आणि मुंबईहुन येणाऱ्या बेस्टच्या बसेसवर ठाणेकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.
ठाणे परिवहन सेवेने खास कॅडबरी ते मंत्रालय अशी बससेवा खास ठाणेकरांसाठी सुरु केली. मात्र ही बस पूर्णपणे तोट्यात चालली असल्याचा महत्वाचा मुद्दा परिवहन सदस्य तकी चेऊलकर यांनी उपस्थित केला. १४४ क्रमांकाची असलेली ही बससेवा दीड महिन्यापूर्वी कॅडबरी पासून सुरु केली. केवळ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या या बससेच्या केवळ दोनच फेऱ्या सुरु होत्या. सकाळी ८ आणि संध्याकाळी साडेचार वाजता ठाण्यातून ही बस सुटते तर सकाळी १० आणि संध्याकाळी ६ वाजता मुंबईहून हि बस सुटते. परंतु जेव्हापासून ही बस सुरु झाली तेव्हापासूनच या बसला प्रवासी नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. बेस्टने सुध्दा ही सेवा यापूर्वीच बंद केली आहे.
परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक यांनी मात्र या बसची प्रसिद्ध व्यविस्थत न केल्याने प्रवाशी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला.परिवहन सभापती अनिल भोर यांनी मात्र या बसचे रूट बदलून उत्पन्न वाढते का याची चाचपणी करावी अशी सूचना केली. मात्र बसला जर प्रवासी नाहीत त्यामुळे ही बस बंदच करावी अशी मागणी चेऊलकर यांनी केल्याने प्रशासनाने ही बस बंद करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना भोर यांनी केली. प्रशासनाची बाजू मांडताना परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी मात्र ही बस प्रायोगिक तत्वावर सुरु केली होती. आता जर बसला प्रवासी नसतील तर ही सेवा बंद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी या बैठकीमध्ये दिली.