Thane: ठाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; खासगी व्यक्तीस लाच स्वीकारताना रंगेहात अटक
By अजित मांडके | Published: April 23, 2024 11:44 AM2024-04-23T11:44:48+5:302024-04-23T11:46:11+5:30
Thane Bribe News: सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे .
- अजित मांडके
ठाणे - सील बंद दुकान उघडून दिल्याबद्दल पाच हजारांच्या लाचेची मागणी करत ती स्वीकारणाऱ्या रोहन मोदी या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे . तर त्याला सहमती दर्शवून प्रोत्साहन देणाऱ्या ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी राजू धोंडीराम आकरूपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली.
तक्रारदारांनी 01 एप्रिल रोजी ठाणे एसीबीत दाखल केलेल्या तक्रारीनुसार 22 एप्रिल 2024 रोजी पडताळणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी राजू आकरूपे यांनी तक्रारदारांचे सील बंद दुकान उघडून दिल्याबाबत 05 हजार रुपये अटकेतील मोदी याच्याकडे देण्यास सांगितले. तर मोदी याने पडताळणी दरम्यान फोनव्दारे आकरूपे यांनी सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वसंत विहार नाका येथे सापळ्यात मोदीला लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची रक्कम आकरुपे यांच्याकरीता घेतली असल्याने त्याने सांगितल्यानंतर गुन्ह्यास सहमती दर्शवुन प्रोत्साहन दिल्याप्रकरणी चितळसर- मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.