Thane: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल,मालवाहू वाहनांना दिवसभर राहणार बंदी
By जितेंद्र कालेकर | Published: October 1, 2024 08:12 PM2024-10-01T20:12:47+5:302024-10-01T20:13:20+5:30
Thane Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे.
ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टाेबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यात भूमिगत मेट्रो ३ मार्गाच्या पहिल्या टप्पाचा समावेश आहे. ठाण्यातील रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ठाणे शहर पाेलिस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी दिली.
ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग आहे. या मार्गांवरून गुजरातकडे आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. गुजरात, मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसेच नाशिक, भिवंडीकडून नवी मुंबई, जेएनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात माल वाहतूक केली जाते. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठया मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.
गुजरातकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने मनोर टोल नाका येथून विक्रमगड-पाली-वाडा-आबिटघर-आटगांव-शहापूर-मुरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळविली आहेत. तर नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहने शहापूर-मुरबाड-कर्जतमार्गे नवी मुंबई जेएनपीटीकडे वळविली आहेत. मुंबईकडून येणारी मोठी वाहने ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत-मुरबाड-शहापूर-वाडा-मनोर टोलनाका मार्गे पाठविली जाणार आहेत. ही वाहने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडने पश्चिम द्रृतगती मार्गाने जातील.
नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी मोठी मालवाहू वाहने कर्जत- मुरबाड-शहापूर मार्गे नाशिककडे तर आटगांव-आबिटघर-वाडा-पाली-विक्रमगड-मनोर टोल नाका- गुजरात मार्गे सोडली जाणार आहेत. ठाणे आयुक्तालयातील सर्वच मार्गांवरुन ५ ऑक्टाेंबर रोजी पहाटे १ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा बदल राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.