ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचं झालं डम्पिंग ग्राउंड, रहिवाशी संतप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:45 IST2025-04-04T17:44:18+5:302025-04-04T17:45:19+5:30
शहरातील घोडबंदर रस्त्याला लागून असलेल्या मुल्लाबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचे डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर करण्यात येत आहे.

ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचं झालं डम्पिंग ग्राउंड, रहिवाशी संतप्त!
ठाणे
शहरातील घोडबंदर रस्त्याला लागून असलेल्या मुल्लाबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोचे डंपिंग ग्राउंडमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. भर वस्तीत असलेली ही जागा डंपिंग ग्राउंडसाठी निवडण्याच्या ठाणे महापालिकेच्या कृतीमुळे रहिवाशांमध्ये मात्र प्रचंड संताप आहे.
छत्रपती शिवाजी महाराज बस डेपोच्या परिसरात हिल क्रेस्ट सोसायटी, सत्यशंकर सोसायटी, कॉसमॉस, नीलकंठ ग्रीन, गणेश नगर असा मोठा रहिवासी पट्टा आहे. त्यात सुमारे सुमारे वीस हजार लोक राहतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) बांधत असलेला बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्प याच परिसरात आहे. शिवाय यातील काही भाग वन खात्याच्या अखत्यारीत येतो.
महापालिकेच्या घंटागाड्यांनी शुक्रवारपासून या बस डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांचा प्रचंड विरोध असतानाही हिरवळ आणि झाडी असलेल्या या भागाचे कचराकुंडीत रूपांतर करण्यात येत आहे.
"या डम्पिंग ग्राउंडमुळे दुर्गंधीचा त्रास तर होईलच त्याबरोबरच हजारो रहिवाशांचे आरोग्यदेखील धोक्यात येणार आहे," अशी प्रतिक्रिया हिल क्रेस्ट सोसायटीचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांनी दिली. "नागरी वस्तीत डम्पिंग ग्राउंड असू नये, असा नियम आहे. या नियमाचे उल्लंघन करून हे डम्पिंग ग्राउंड होत असल्यामुळे तुम्हाला आमच्या आरोग्याची काळजी वाटते," असे शिंदे म्हणाले.