Thane: कळवा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:44 PM2023-08-14T22:44:34+5:302023-08-14T22:45:14+5:30
Eknath Shinde: प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
रुग्णांच्या मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कळवा येथील रुग्णालयाला मुख्यमंत्री एकनाथ यांनी आज भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कळवा रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये पाहणी केली. रुग्णलयाच्या नातेवाईकांना भेटलो. १८ लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्या प्रकरणात चौकशी समिती गठीत केली आहे. ही समिती ९ जणांची असून, या समितीला तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. तसेच पुढील अहवालावरून कारवाई होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, हे रुग्णालय ५०० बेडसचे आहे. सध्या ६०० रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. आजही लॉबीमध्ये कॉट टाकून रुग्णांवर उपचार होताना मी पाहिले आहे. जागा नाही म्हणून आलेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णलयात डॉक्टर पाठवत नाहीत. या रुग्णलयावर रुग्णाचा विश्वास आणि भार मी पाहिला आहे. ही घटना झाल्यानंतरसुद्धा ९१ रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच २२ रुग्णावर शस्त्रक्रिया झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
या रुग्णालावरील भार पाहिल्यानंतर जे काम डॉक्टर आणि कर्मचारी करताहेत त्यांचं मानसिक खच्चीकरण होता कामा नये. डॉक्टर जीव लावून रुग्णांवर उपचार करण्याचं काम करत असतो. मी आयसीयूमध्ये जाऊन पाहणी करून आलो आहे. खाजगी रुग्णालयातून काही रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी आले आहेत. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मी बोललोय. या सगळ्यांनी उपचाराबद्दल समाधान व्यक्त केलं आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं.