ठाणे : दहीहंडी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह मंत्री लावणार हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 03:41 PM2018-08-29T15:41:29+5:302018-08-29T15:41:42+5:30
मराठी संस्कृतीचे जतन करताना सामाजिक बांधिलकी जपून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत स्वामी प्रतिष्ठानतर्फे साजरा होणाऱ्या सामाजिक समरसता दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळून 7 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाईल.
ठाणे - मराठी संस्कृतीचे जतन करताना सामाजिक बांधिलकी जपून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत स्वामी प्रतिष्ठानतर्फे साजरा होणाऱ्या सामाजिक समरसता दहीहंडीमध्ये केरळमधील पूरग्रस्त आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळून 7 लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाईल. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या ठाण्यातील दहा आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती ही आकर्षण ठरणार असल्याची माहिती भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ठाण्यातील हिरानंदानी मिडोज चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्ययगृहासमोर स्वामी प्रतिष्ठान तर्फे सर्व नियमांचे पालन करुन हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे जतन, प्रचार करताना सामाजिक बांधिलकीचे भान जपण्याचे प्रयत्न दहीहंडी उत्सवातून केले जाणार आहे. ठाण्यातील या दहीहंडीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून गोविंदांचा उत्साह वाढविणार आहेत. मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विमा काढण्यात येणार आहे. सर्वात मोठी हंडी लावणाऱ्यांना 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून विविध थरांना सुमारे 50 लाख रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात करण्यात येणार आहे. याचवेळी केरळमधील पूरग्रस्तांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सात लाख रुपये दिले जाणार आहेत. हा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
यावेळी ठाणेकरांच्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री हे आपली कला सादर करणार आहेत, असे शिवाजी पाटील यांनी सांगितले. 3 सप्टेंबरला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणाऱ्या दहीहंडीच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला सेलिब्रेटींची दहीहंडी होणार आहे. यावेळी सुशांत शेलार, शर्मिष्ठा राऊत, रुपाली भोसले, मीरा जोशी, केतकी चितळे, राधा कुलकर्णी, स्मिता शेवाळे, सिया पाटील, मधुरा देशपांडे, प्रिती सदाफुले आणि माधवी निमकर हे कलाकार तसेच अभिजीत कोसंबी आणि इतर चार गायक कलाकार यात सहभागी होणार आहेत.
सर्व ठाणेकर, गोविंदांनी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दहीहंडी उत्सहात सामिल होऊन प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन स्वामी प्रतिष्ठानकडून केले जात असल्याचे आयोजक शिवाजी पाटील, निमंत्रक अॅड. संदीप लेले आणि आमदार अॅड निरंजन डावखरे यांनी केले आहे.