ठाणे शहर काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:09 AM2019-08-27T00:09:47+5:302019-08-27T00:10:30+5:30
दोन गटांत वाद : श्रेष्ठींकडे केली तक्रार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध विभागांत सुरूअसलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून ठाणे शहर काँग्रेसचे रवींद्र आंग्रे यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतु, ते काँग्रेसचे नसून त्यांचे वैयक्तिक असल्याचा दावा शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला. आंदोलन करण्यापूर्वी आंगे्र यांनी पक्षाला कोणत्याही प्रकारे विश्वासातच घेतले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्यात उरल्यासुरल्या काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील पाच वर्षांत ठाणे महापालिकेत टीडीआर घोटाळा, १०० कोटींचा वर्तकनगर म्हाडा पुनर्विकास घोटाळा, कोट्यवधींचा शिक्षणखात्यातील घोटाळा, रस्तेबांधणी, घनकचरा, बीएसयूपी घरेवाटप आणि नालेसफाई असे विविध घोटाळे घडले असून यामध्ये पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला अद्याप शासन झाले नसल्याचा दावा आंग्रे यांनी केला आहे. मात्र, याबाबतचे पुरावे मागितले असता, त्यांना ते सादर करता आलेले नाहीत. परंतु, या घोटाळ्यांमध्ये केवळ पालिकेचेच अधिकारी दोषी असून लोकप्रतिनिधींबाबत बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
या घोटाळ्यांची सीबीआय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व कारवाई व्हावी, या उद्देशाने येत्या १८ आॅगस्ट रोजी ठाणे महापालिका मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर, २९ आॅगस्ट रोजी याच मागणीसाठी साखळी उपोषणही करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे कोकण प्रभारी बी.एम. संदीप व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन हे सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.
वाद आणखी चिघळणार
या आंदोलनास ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी आक्षेप घेतला असून याबाबत पक्षातील कोणत्याही पदाधिकाºयाला आंग्रे यांनी कल्पना दिली नसल्याचा दावा केला. यावरून आंग्रे यांनी छेडले असता, ही पक्षांतर्गत बाब असून यासंदर्भात श्रेष्ठींकडे शहराध्यक्षांची तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने ठाण्यातील उरल्यासुरल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत दुफळी माजली आहे.