ठाणे शहर फणफणतेय तापाने; मलेरियाचे ७५ तर दोन डेंग्यूचे रुग्ण
By जितेंद्र कालेकर | Published: September 12, 2022 07:24 PM2022-09-12T19:24:53+5:302022-09-12T19:25:49+5:30
अनेक भागात धूर फवारणी: आराेग्य अधिकारी भिमराव जाधव यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना आणि स्वाईन फ्ल्यू या आजारांपाठोपाठ ठाणे शहरात डेंग्यू तसेच मलेरिया या साथीच्या आजारांनी ही डोके वर काढले आहे. आॅगस्ट महिन्यात मलेरियाचे ७५ रुग्ण तर डेंग्यूचे दोन रुग्ण आढल्याची माहिती ठाणे महापालिका आरोग्य विभागाने दिली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे १४ तर मलेरियाचे ४७ रुग्ण आढळले होते. आॅगस्टमध्ये डेंग्यूची रुग्ण संख्या जरी कमी झाली असली तरी मलेरियाचे रुग्ण वाढली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आॅगस्ट २०२२ मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या २३ आणि निश्चित निदान झालेले एकूण दोन रुग्ण आहेत. तर मलेरियाचे ७५ रुग्ण आढळले. त्याचबरोबर चिकनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन ४४ हजार ८९६ घरांची तपासणी केली. या तपासणीत ५५७ घरे दूषित आढळली. तसेच एकूण ६१ हजार ३१४ कंटेनरची तपासणी केली असता ६६२ कंटेनर दूषित आढळून आली. त्या ६६२ दुषित कंटेनरपैकी २७७ कंटेनरमध्ये अळीनाशक टाकले. तर ३७३ कंटेनर रिकामी करण्यात आले.
तसेच चार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. याच दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात ५० हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-१०, ई रिक्षा सहा तर १० बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात दोन हजार ७०८ ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे १७ हजार ९४६ ठिकाणी धूरफवारणी केल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव जाधव यांनी सांगितले.