ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व चौक्या सुधारणार
By admin | Published: December 24, 2015 01:44 AM2015-12-24T01:44:00+5:302015-12-24T01:44:00+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या चौक्या तातडीने दुरूस्त करण्याचे, त्यांत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत.
जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या चौक्या तातडीने दुरूस्त करण्याचे, त्यांत आमूलाग्र सुधारणा करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले आहेत. या चौक्यांमध्ये तक्रार घेण्यासाठी २४ तास अधिकारी आणि कर्मचारीही नियुक्त करण्यात येणार आहेत.
यासाठी रोटरी, लायन्ससारख्या वेगवेगळ््या सामाजिक-स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २२ डिसेंबरच्या अंकात ठाणे पूर्व येथील आनंद टॉकीज-सिंधी कॉलनी, बी केबीन, कल्याणचे पौर्णिमा टॉकीज-बाजारपेठ पोलीस ठाणे, वल्लीपीर नाका, अंबरनाथचा शिवाजी चौक अशा विविध ठिकाणच्या पोलीस चौक्यांच्या दूरवस्थेची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांना कशी अवकळा आली आहे, त्याचे चित्र मांडले होते. त्यांच्या दुरूस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने कायद्यासोबत सुव्यवस्था राखणाऱ्यांची कशी परवड होते आहे, याचा आँखो देखा हाल मांडण्यात आला होता. त्याची तातडीने दखल घेत मंगळवारच्या बैेठकीत आयुक्तांनी सर्व चौक्यांचा आढावा घेण्याचे आदेश ठाणे शहर, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळातील उपायुक्तांना दिले.
काय आहेत आदेश
सर्व पोलीस चौक्यांचा आढावा घेऊन त्यांचे बाहय आणि अंतरंग चांगले करावे. त्यासाठी सामाजिक संस्थांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचीही मदत घ्यावी. चौक्यांचे बांधकाम मजबूत करावे. फर्निचरची व्यवस्था करुन रंगरंगोटी तसेच साफसफाई करुन चौकी सुव्यवस्थेत ठेवावी. चौकीत तक्रार घेण्यासाठी २४ तास कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.