ठाणे जिल्हाधिकार्यांना मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य हवे !
By सुरेश लोखंडे | Published: September 18, 2023 07:28 PM2023-09-18T19:28:14+5:302023-09-18T19:28:28+5:30
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे.
ठाणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण सुरु आहे. या केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाच्या कामासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना आज केले.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कोकण विभाग पदवीधर मतदार नोंदणी आदींची माहिती देण्यासाठी ही बैठक आज पार पडली. यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, रेवती गायकर, शीतल देशमुख, तहसिलदार वृषाली पाटील यांच्यासह शिवसेना,भारतीय जनता पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणीसंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठकांना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे. मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी या प्रतिनिधींकडून केली.
जिल्ह्यात एकूण ६३ लाख ४३ हजार ८०६ मतदार आहे. यामध्ये ३४ लाख ३२ हजार ८८१ पुरुष व २९ लाख नऊ हजार ८२८ स्त्री मतदार आणि १०९७ तृतीयपंथीय मतदार आहेत. मतदारयादीमध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळेजिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मतदारसंख्येनुसार एक हजार ५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची संख्या १०२ झाली आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात तळमजला सोडून पहिला, दुसरा व तिसऱ्या मजल्यावर एकूण २५१ मतदान केंद्रे आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्याबाबतची खात्री करण्याचे निर्देश सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.