जिल्हाधिकारी ‘सरां’नी घेतला दहावीच्या वर्गावर तास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:28 PM2021-10-04T16:28:47+5:302021-10-04T16:29:10+5:30

सुदृढ राहा आणि पालकांच्या मनातील भिती घालवा, विद्यार्थ्यांना केले आवाहन.

thane collector teaching school reopen after coronavirus pandemic | जिल्हाधिकारी ‘सरां’नी घेतला दहावीच्या वर्गावर तास

जिल्हाधिकारी ‘सरां’नी घेतला दहावीच्या वर्गावर तास

googlenewsNext
ठळक मुद्देसुदृढ राहा आणि पालकांच्या मनातील भिती घालवा, विद्यार्थ्यांना केले आवाहन

ठाणे: नौपाड्यातील गोखले रस्त्यावरची सरस्वती मंदीर ट्रस्टच्या शाळेची घंटा तब्ब्ल पावणे दोन वर्षांनी वाजली…दुसऱ्या मजल्यावरच्या दहावी ब च्या वर्गात शिक्षक आले..विद्यार्थ्यांनी त्यांना एका स्वरात नमस्ते केले…शिक्षकांनी त्यांची ओळख करून दिली नमस्कार मी राजेश नार्वेकर…आज तुम्हाला स्त्री शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे यांच्यावरील कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविणार आहे…आणि पुढील किमान पाऊण तास जिल्हाधिकारी नार्वेकर ‘सरां’नी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन त्यांच्याशी गप्पा मारीत वर्गावरचा तास पूर्ण केला. कोरोना कालखंडात बंद असलेल्या शिक्षण पर्वाचा शुभारंभ आज अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले.

शाळेत आज वेगळीच लगबग सुरू होती. प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. शाळेची घंटा फुलांनी सजविली होती. कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरू व्हायला पावणे दोन वर्ष लागले. त्यामुळे आज हा नव्या शैक्षणिक पर्वाचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी मुलांना शिकविण्याचा मानस केला होता.

त्यानुसार सरस्वती मंदीर ट्रस्टच्या नव्या इमारतीत आज प्रथमच वर्ग भरले होते. जिल्हाधिकारी नार्वेकर शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील दहावी ब च्या वर्गात तास घ्यायला आले. वर्गशिक्षिकेनी नविन सरांची ओळख विद्यार्थीनींना करून दिली. त्यानंतर पुढचा पाऊण तास नार्वेकर या वर्गावर होते. त्यांनी दहावीच्या मराठी पुस्तकातला कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविला. महिलांना शिक्षित केलं तरच भारतीय स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने महत्व मिळेल या उद्देशाने धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या कार्याची शिकवण त्यांनी या धड्याच्या माध्यमातून दिली. 
पुस्तकी ज्ञानासोबतच सभोवतालचे ज्ञान वाढवावे. स्वताला विकसीत करण्यासाठी चौफेर ज्ञान मिळावावे. विश्लेषणात्मक अभ्यास करावा. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला प्राधान्य द्यावे, असे नार्वेकर यांनी सांगितले.     

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होता. शिक्षकांकडून होणारे संस्कार प्रत्यक्ष शाळेत आल्यावर मिळतात. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यात. मित्र-मैत्रिणी पुन्हा प्रत्यक्ष भेटतील. पालकांनी तुम्हाला शाळेत पाठवलं आहे तुम्ही सुदृढ राहीलात तर त्यांच्या मनात भिती राहणार नाही आणि समाजापुढेही मोठा संदेश जाईल.यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.

दरम्यान, सकाळी महापौर नरेश म्हस्के आणि जिल्हाधिकारी नार्वेकर, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या हस्ते घंटा वाजवून शाळा सुरू करण्यात आली. यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभात महापौर आणि जिल्हाधिकारी यांनी शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत अनेक आठवणी सांगितल्या. शिक्षकांचे संस्कार आहेत म्हणून शाळेचा एक विद्यार्थी महापौर झाला, असे म्हस्के यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत याचा आनंद असून शैक्षणिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. 

Web Title: thane collector teaching school reopen after coronavirus pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.