खासदार सुप्रिया सुळेंशी हुज्जत घालणाऱ्या टॅक्सी चालकाच्या कारवाईसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 07:16 PM2019-09-13T19:16:37+5:302019-09-13T19:22:12+5:30
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी टॅक्सी चालकाने दादर रेल्वे स्टेशनबाहेर गुरूवारी भाड्यासाठी हुज्जत घालून गैरवर्तन ...
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी टॅक्सी चालकाने दादर रेल्वे स्टेशनबाहेर गुरूवारी भाड्यासाठी हुज्जत घालून गैरवर्तन केले. या टॅक्सी चालकावर त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शुक्रवारी निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन दिले.
खासदार सुप्रिया सुळे गुरूवारी देविगरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक दादर टर्मिन्स येथे गाडीत प्रवेश करीत प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठल आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्रा ऐकेचना. त्याने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली काळ्या साड्या परिधान करु न महिला कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निदर्शने केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महिलां कार्यकर्त्यांनी ही निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना या टॅक्सी चालकासह अशा प्रवृत्तीच्या टॅक्सी चालकांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. या शिवाय या महिला आंदोलकांनी गृहखात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, जो प्रकार मुंबईत घडला; तसाच प्रकार ठाण्यातही घडण्याची शक्यता असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी प्रशासनाला दिले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारख्या व्यक्तीला जर टॅक्सी चालक असा त्रास देत असतील तर सामान्य महिलांची सुरक्षा वाऱ्यांवरच असल्याचे दिसत आहे. आज युती सरकारच्या काळात लहान मुली, तरु णी, महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे असे घाग यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या आंदोलनात नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, आरती गायकवाड, वहिदा खान, अंकिता शिंदे, फरझाना शेख,आशिरन राउत, रु पाली गोटे ; प्रदेश सचिवज्योती निंबरगी, शशिकला पुजारी, युवती अध्यक्षा प्रिंयका, स्मिता पारकर, वंदना लांडगे, वंदना हुंडारे, शुंभागी कोलपकर, सुवर्णा खिल्लारे, संगिता चंद्रवंशी, सुनिता पवार, मनिषा पाटील आदी महिलांचा समावेश होता.