ठाण्याच्या कोपरीमध्ये एकाच दिवशी दोघांनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:43 PM2018-08-22T22:43:06+5:302018-08-22T22:47:01+5:30
सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना ठाण्यात मंगळवारी घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने तसेच कौटंूबिक कलहातून तर विवेकने एकतर्फी प्रेमातून आपले जीवन संपविले.
ठाणे : कोपरी परिसरात मंगळवारी एकाच दिवशी सुभाष पवार (३८) आणि विवेक अय्यपन (२७) या दोघांनीही आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. सुभाषला अपत्यप्राप्ती नसल्याने आणि विवेकने एकतर्फी प्रेमातून हे पाऊल उचलल्याची शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी वर्तवली आहे.
सुभाष हा कोपरीतील आनंदनगर झीरो गल्ली येथे वास्तव्याला होता. त्याने २१ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घरातील छताला गळफास घेतला. त्याच्या लग्नाला १२ वर्षे झाली होती. पण, अपत्यप्राप्ती नव्हती. शिवाय, तो कर्जबाजारीही होता. त्यातूनच दारूच्याही आहारी गेला होता. पत्नीशीही त्याचे वाद होत होते. अशा अनेक कारणांनी तो वैफल्यग्रस्त होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास कोपरीतील गुरुकृपा सोसायटीतील विवेक अय्यपन यानेही घरातच नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याने आईवडील आणि मित्रांसाठी अशा दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या हिंदीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या विवेकचे १० वर्षांपूर्वी तामिळनाडूतील एका तरुणीबरोबर प्रेम होते. १० वर्षांपासून त्याचे तिच्यावर प्रेम असूनही तिचा मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. यातूनच आईवडील आणि मित्रांची माफी मागून आपण आत्महत्या करत असून त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, असेही त्याने या चिठ्ठ्यांमध्ये म्हटले आहे. याप्रकरणीही चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी सांगितले.
--------------------------------