ठाण्याची स्पर्धा पुण्याशी
By Admin | Published: April 12, 2016 01:09 AM2016-04-12T01:09:50+5:302016-04-12T01:09:50+5:30
मुंबई, पुणे या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातून पालघर या आदिवासीबहुल क्षेत्राचा नवा जिल्हा निर्माण झाल्याने मानव विकास निर्देशांकाच्या नव्या अहवालात
ठाणे : मुंबई, पुणे या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातून पालघर या आदिवासीबहुल क्षेत्राचा नवा जिल्हा निर्माण झाल्याने मानव विकास निर्देशांकाच्या नव्या अहवालात पुणे शहराशी ठाण्याची स्पर्धा होण्याची व दरडोई उत्पन्नात पुणे उणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर हे दोन तालुके मागास असून उर्वरित सर्व तालुके संपन्न आहेत.
ठाणे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकाच्या आराखड्याचे सादरीकरण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना करण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर झालेल्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबईचा मानव विकास निर्देशांक ०.८४१, पुण्याचा ०.८१४ तर ठाणे जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक ०.८०० आहे.
जिल्ह्याचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर नव्या ठाणे जिल्ह्याचा मानव विकास अहवाल यशदा आणि मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे तयार करण्यात आला. यासाठी ७५० नागरी तर २५० ग्रामीण भागातील घरांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. राहणीमानाचा दर्जा, आरोग्य, रोजगार, दारिद्रय, लैंगिक असमानता, साक्षरता, पायाभूत सुविधा, अशा निकषांच्या आधारे नोंदले गेलेले निष्कर्ष यावेळी मांडण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांत वरील निकषांच्या आघाडीवर वाईट परिस्थिती आहे.
सदर अहवाल इंग्रजी आणि मराठीत तयार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसमोर ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. मानवी विकासाचा वेग अभ्यासण्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमतर्फे असा अहवाल तयार करण्यात येत असतो याचाच एक भाग म्हणून नीती आयोगाच्या सूचनेनुसार मानव विकास अहवालाचे काम केले जाते अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी दिली. अर्थशास्त्र विभागाच्या डॉ. मनीषा कर्णिक, प्रो. नाडकर्णी, स्वाती राजू, संध्या म्हात्रे तसेच यशदाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.