ठाण्यात ‘डांबर’ट ठेकेदारांना लगाम, खोदकामाची परवानगी कुणालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:29 AM2018-09-01T04:29:58+5:302018-09-01T04:30:27+5:30
ठाणे : ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा डांबरट ठेकेदारांना लगाम घालण्यासाठी यापुढे शहरातील नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक्रिटचेच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतला.
रस्त्यांचे आयुर्मान वाढावे, हा यामागचा उद्देश असून तसे आदेश आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. यंदा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे काही केल्या बुजवले जात नाहीत. त्यासाठी प्रशासन नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे. आयुक्तांपासून महापौर, पालकमंत्र्यांना रस्त्यांवर उतरण्याची नामुश्की ओढवली. आयुक्तांनी स्वत: रात्रीच्यावेळी शहरातील रस्त्यांवर उतरून खड्डे बुजवण्याचे काम करून घेतले. तरीही रस्त्यांची अवस्था दयनीय असून, ठेकेदारांच्या चुकीमुळे पालिका प्रशासनालाच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी यापुढे कोणतेही नवीन रस्ते हे डांबरी करणार नसल्याचा निर्णय घेतला. यावेळी आणखी काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार रस्त्याचे काम करताना मलनि:सारण, गटार, पाणीपुरवठा, विद्युत, दूरसंचार विभाग, महानगर गॅस, महावितरण या विभागांना सेवावाहिन्यांसाठी आधीच परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
रस्त्याचे काम झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत खोदकामासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याच्या सूचना बैठकीमध्ये अधिकाºयांना दिल्या. रस्त्याचे काम झाल्यानंतर सेवावाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदले जातात. त्यामुळे रस्ते पुन्हा खराब होऊन खड्डे पडतात.
ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत जे रस्ते यापुढे बनवण्यात येणार आहेत, ते सर्व रस्ते सिमेंट किंवा यूटीडब्ल्यूटीमध्ये बनवण्याबरोबरच त्या रस्त्यांना सेवावाहिन्यांसाठी डक्ट बनवणेही बंधनकारक असणार असल्याचे आयुक्तांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले.