ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 07:52 PM2021-06-17T19:52:41+5:302021-06-17T19:53:58+5:30

बिले न काढल्यास सुरू असलेली कामं बंद करण्याचा इशारा. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती झालीये बिकट.

Thane: Controversy of contractors in front of the municipality in the pouring rain to get the bills | ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन

ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देबिले न काढल्यास सुरू असलेली कामं बंद करण्याचा इशारा. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती झालीये बिकट.

ठाणे  : कोरोनामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असली तरी मागील २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणी पुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिलेच अदा केली नसल्याने संतप्त झालेल्या या ठेकेदारांनी गुरुवारी सांयकाळी पाच वाजता भर पावसात महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. येत्या दोन दिवसात पाणी विभागाने बिल काढले नाही, तर सोमवार पासून सुरु असलेली सर्वच कामे बंद करु असा इशारा यावेळी या ठेकेदारांनी दिला आहे. तसेच लवकरात बिले काढण्यात यावीत, अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा करावरच पालिकेची सध्या मदार आहे. परंतु २०१९ पासून सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान, पाणी पुरवठा, ड्रेनेज आदींसह इतर विभागातील कामे पूर्ण करुन देणाऱ्या ठेकेदारांची अद्यापही बिले निघाली नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोना काळातही आमच्याकडून पालिकेने अत्यावश्यक स्वरुपाची कामे करुन घेतली आहेत. कामे पूर्ण करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील आमच्या मागे लागले होते. परंतु आता कामे पूर्ण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी देखील आमच्याकडे पाठ फिरविली असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 

बिले निघत नसल्याने कच्चा माल ज्यांच्याकडून घेतला आहे, त्यांचे फोन येऊन त्यांचा त्रस सहन करावा लागत आहे. महापालिकेची कामे पूर्ण करण्यासाठी कर्ज काढून कामे केलेली आहेत. परंतु आता कर्जाचे हप्ते थकले आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. कामे करुन घेण्यासाठी जे काही कर्मचारी कामाला होते, त्यांना देखील देण्यासाठी पैसे नसल्याचा मुद्दा यावेळी या ठेकेदारांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही आंदोलन 
दरम्यान मधल्या काळात आंदोलन केल्यानंतर २५ लाखांची बिले काढण्यात आली होती. परंतु त्यानंतर बिले काढलीच जात नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. तर आतार्पयत ७०० ते ८०० कोटींची बिले पालिकेने अदा केली नसल्याचा दावा देखील या आंदोलनकर्त्या ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात पालिकेने यावर ठोस निर्णय घेऊन बिले अदा करावी अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशाराही देखील देण्यात आला आहे. तसेच महापालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषणही करण्याचा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Web Title: Thane: Controversy of contractors in front of the municipality in the pouring rain to get the bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.