ठाण्यात कोरोनामुळे डेंग्यू आला आटोक्यात, ठामपाने इतर आजार रोखण्यासाठी उचलली पावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 01:39 AM2021-02-04T01:39:08+5:302021-02-04T01:39:40+5:30
Thane News : देशात २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात दरवर्षी महासभा व स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि मलेरियावर रणसंग्राम होताना दिसून आला आहे.
- अजित मांडके
ठाणे : देशात २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात दरवर्षी महासभा व स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि मलेरियावर रणसंग्राम होताना दिसून आला आहे. मात्र, यंदा तशी चर्चाही झाली नसून कोरोनामुळे ठाण्यात डेंग्यूही आटोक्यात आला आहे. २०२० मध्ये शहरात डेंग्यूचे केवळ ७९ रुग्ण सापडले आहेत. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्के कमी आढळले आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर स्वच्छता, साफसफाईला अधिक महत्त्व दिले गेले. लॉकडाऊनमुळे शहरात रस्त्याची, इमारतींची कामेही बंद असल्याने पाणी साचण्याची प्रक्रियाही थांबली होती. यामुळे शहरात इतर आजारांचे प्रमाण कमी झाले. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया व इतर आजार डोके वर काढतात. डेंग्यूमुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते. २०२० मध्ये मात्र डेंग्यूवर साधी चर्चाही झालेली नाही. कोरोनाची साथ सुरू असतानाही मनपाने इतर आजार रोखण्यासाठीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.
डेंग्यूचा सर्व्हे
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय १०० जणांच्या पथकामार्फत घरोघरी सर्व्हे केला होता.
यात ताप, सर्दी, थंडी, खोकला, साथरोग आदींसह मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांचाही सर्व्हे झाला. त्यानुसार २७ हजार घरांमध्ये फवारणीही करण्यात आली. तर, शहरातील एक लाखाहून अधिक घरांचा सर्व्हे केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणे, थकवा जाणवणे, थंडी वाजणे आदी प्रमुखे लक्षणे दिसून येतात. त्यावेळेस रक्ताची चाचणी केल्यास डेंग्यूचे निदान होते. परंतु,या प्रमुख लक्षणांव्यतिरिक्तक्त इतर काही महत्त्वाची लक्षणे यात आढळत नाहीत.
कोरोनामुळे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजले होते. घराची स्वच्छताही केली गेली. त्यामुळेच मागील वर्षी इतर आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही महापालिकेने इतर आजारांवर लक्ष दिले. त्यानुसार सर्व्हेदेखील केला होता.
- डॉ. राजू मुरुडकर
मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
ठाणे महापालिका