पालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत पालकमंत्री शिंदे, महापालिका आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 03:56 PM2019-08-04T15:56:43+5:302019-08-04T16:02:11+5:30
परिस्थितीचा घेतला आढावा
ठाणे - गेले दोन दिवस सतत सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बारवी धरणातून पाणी सोडल्यामुळे उल्हास नदी आणि खाडीच्या पाण्याची पातळी वाढली असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ठाणे शहरात कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून महापालिका आयुक्त सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आहेत. तसेच महापालिका मुख्यालयासह, प्रभाग समिती स्तरिय यंत्रणा, आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा कार्यरत आहे. दिवा येथे टीडीआरएफच्या दोन तुकड्या, ६ बोटी उप आयुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता मदत कार्य करीत आहेत. या ठिकाणाहून जवळपास ४ हजार रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून तिथे मदतकार्य सुरूच आहे. कळवा येथेही टीडीआरएफची एक तुकडी सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, बोटसह संपूर्ण यंत्रणा मदतकार्यात कार्यरत आहे. येथील रघकुल सोसायटीमधील २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. श्रीरंग आणि वृंदावन सोसायटी येथेही महापालिकेने बोट पाठविण्यात आली आहे. नागरिकांना तात्काळ मदत पुरविण्यात येत आहे.
मुंब्रा येथील चार घरांचा भाग कोसळल्यामुळे ती घरे खाली करण्यात आली तर माजिवडा प्रभाग समिती येथील पातलीपाडा येथील धोकादायक स्थितीतील २५ घरे खाली करण्यात आली. येथील लोकांना संक्रमण शिबीरामध्ये स्थलांतरित केले आहे. कळवा येथील रघकुल सोसायटीमधील २५ रहिवाशांना जवळच्या शाळेमध्ये हलविण्यात आले आहे. वर्तकनगरयेथील स्ट्रीट चिल्ड्रन शेल्टर होम येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेमध्ये स्थलातंरित करण्यात आले आहेत. दरम्यान महापालिकेच्या सर्व यंत्रणेशी महापालिका आयुक्त स्वत: संपर्कात असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.