ठाण्य़ाच्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:15 PM2018-09-12T19:15:33+5:302018-09-12T19:15:52+5:30
ठाणे : राज्यात गेल्या पाच वर्षांत राखीव जागांवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या परंतु त्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सुमारे 450 लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाली. आता ठाणे महापालिकेने सुध्दा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करुन अखेर भाजपाच्या प्रबग क्रमांक 15 - अ च्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. या संदर्भात महापालिकेने दुजोरा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात जात प्रमाणपत्र सादर न करण्यासंदर्भात निर्णय दिला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेत या बाबत चौकशी केली असता, सहा महिन्यांच्या आत जवळ जवळ सर्वच नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु एका प्रकरणात भाजपाच्या सुवर्णा कांबळे या नगरसेविकेने सादर केले नव्हते. परंतु त्या उच्च न्यायालयात गेल्या असल्याने त्यांच्याकडून ते उशिराने सादर झाल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु आता या न्यायालयाने दिलेल्या आदेशांची सविस्तर चर्चा करुन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवक पद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात सचिव अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.