लोकसभा निवडणूकीत निवडून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील दाम्पत्याची २० लाखांची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: August 8, 2019 09:51 PM2019-08-08T21:51:22+5:302019-08-08T21:59:14+5:30
गुरुदेव महाराजांकडून पूजापाठ करुन लोकसभा निवडणूकीमध्ये निवडून आणू, असा दावा करीत ठाण्यातील एका महिला उमेदवाराला २० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पैशांची मागणी केल्यानंतर तिच्यासह कुटूंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात मध्यप्रदेशातील सरकार उर्फ गुरुदेव महाराज याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे: आमचे सरकार उर्फ गुरुदेव महाराज हे यज्ञ पूजापाठ करुन निवडणूकीत उमेदवार निवडून आणतात, अशी बतावणी करीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या एका महिला उमेदवाराची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पैसे मागितल्यास तुमच्यासह कुटूंबियांनाही खल्लास करु, अशी धमकीही शर्माने त्यांना दिली आहे. याप्ररकणी नवी मुंबईतील नचिकेत जाधव, चंदीगडमधील अरविंद शर्मा आणि मध्यप्रदेशातील गुरुदेव महाराज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात ठाण्याच्या बाळकूम, यशस्वीनगर येथील रहिवाशी असलेल्या विद्यासागर चव्हाण यांनी ७ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार १८ मार्च २०१९ रोजी ते ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीला लोकसभा निवडणूकीसाठी उभे करण्यासंदर्भात तेथील कॅन्टीनमध्ये ते फोनवरुन बोलत होते. त्यांचे हेच बोलणे ऐकल्यानंतर तिथे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ‘तुम्ही जर तुमची पत्नी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून उभे करणार असाल तर आम्ही निवडून आणू,’ अशी त्यांना बतावणी केली. नवी मुंबईतील घणसोलीमध्ये वास्तव्याला असून नचिकेत जाधव अशी त्याने आपली ओळखही सांगितली. नागपूरच्या पुढे पांडूर्णा येथे त्यांचे गुरुदेव आहेत. त्यांनी मध्यप्रदेशात ४० आमदार निवडून आणले आहेत. चंदीगडचे अरविंद शर्मा हेही यासाठी मदत करतील, अशीही त्याने बतावणी केली. सुरुवातीला मध्यप्रदेशातील पांडूर्णा येथे जाण्यासाठी विमान आणि रेल्वेच्या तिकीटासाठी त्याने ठाण्यातील कापूरबावडी येथील बिगबाजार याठिकाणी २२ मार्च २०१९ रोजी ५० हजार रुपये घेतले. २४ मार्च रोजी मध्यप्रदेशातील सरकार उर्फ गुरुदेव महाराजांना ते भेटले. तुमच्या पत्नीस लोकसभा निवडणूकीत निवडून आणून देईल, असा दावा करीत महाराजांनी एका डब्यातून त्यांना चिठ्ठी दिली. ‘चौहान साहब को सांसद बनाने के लिए १२ लाख अरविंद शर्मा को देना है और सासद बन जात हो तो पाच करोड देना है और पाच लाख खर्चा देना है,’ असे या चिठ्ठीमध्ये लिहिलेले होते. ही चिठ्ठी वाचल्यानंतर चव्हाण यांनी त्यांना होकारही दिला. त्यानंतर तुम्ही पत्नीचा तातडीने फॉर्म भरा. निवडणूकीत जिंकून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, ती पूर्ण करु असेही शर्मा आणि जाधव यांनी फोनद्वारे त्यांना सांगितले. ९ एप्रिल रोजी त्यांनी पत्नी शुभांगी चव्हाण हिचा ठाणे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापासून ते २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रीया पूर्ण होईपर्यत नचिकेत जाधव या त्यांच्यासोबतच होता.
त्याच दरम्यान १२ एप्रिल ते २७ एप्रिल २०१९ या कालावधीत त्याने निवडणूकीत शुभांगी चव्हाण यांना जिंकून आणू, असे सांगून त्यांच्याकडून २० लाख रुपये धनादेशाद्वारे घेतले. यातील शेवटचे ४ एप्रिल रोजी ५० हजार रुपये, १८ एप्रिल रोजी ५० हजार रुपये आणि २७ एप्रिलचा साडे चार लाखांचा धनादेश हे नचिकेतच्या नावाने तर उर्वरित सर्व धनादेश अरविंद शर्मा याच्या नावाने घेण्यात आले आहेत. २३ मे २०१९ रोजी मात्र लोकसभा निवडणूकीत ठाण्यातून अपक्ष उमेदवार चव्हाण यांचा पराभव झाल्याने २८ मे रोजी जाधव आणि शर्मा या दोघांकडे त्यांनी २० लाखांची रक्कम परत मागितली. त्यावर पैसे देणार नाही. तुम्ही आणि पोलीस काय करायचे ते करा. पुन्हा पैसे मागाल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना खल्लास करु, अशी शर्माने त्यांना धमकी दिली. याच प्रकाराने घाबरुन चव्हाण यांनी तक्रारही केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी काूपरबावडी पोलीस ठाण्यात नचिकेत जाधव, अरविंद शर्मा आणि गुरुदेव महाराज (रा. मध्यप्रदेश) या तिघांविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. वाघ याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.