ठाण्यातील दाम्पत्याचा सेल्फी काढताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:41 AM2021-01-03T05:41:08+5:302021-01-03T05:41:13+5:30
गुहागर तालुक्यातील हेदवी-बामणघळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथे जाण्याचा माेह आवरता येत नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुहागर (जि. रत्नागिरी) : समुद्राच्या लाटांशी माैजमजा करताना ठाणे येथील पती-पत्नीला सेल्फी काढण्याचा माेह झाला आणि त्याच नादात त्या दोघांचाही डोंगरात घुसलेल्या समुद्रातील बामणघळीत पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुहागर तालुक्यातील हेदवी येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अनंत माणगावकर (३६) आणि सूचना माणगावकर (३३) अशी दाेघांची नावे आहेत.
गुहागर तालुक्यातील हेदवी-बामणघळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना तेथे जाण्याचा माेह आवरता येत नाही. या ठिकाणी डोंगरामध्ये नैसर्गिक घळ तयार झाली आहे. या खोल घळीत समुद्राच्या लाटा उसळत असतात. त्याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनंत आणि सूचना हे आई, मामेभाऊ यांच्यासमवेत फिरण्यासाठी गुहागरमध्ये आले हाेते. शनिवारी ते बामणघळ पाहण्यासाठी गेले. तेथे लाटांशी माैजमजा करत असताना अनंत आणि सूचना माणगावकर यांना सेल्फी काढण्याचा माेह झाला. सेल्फी काढत असताना पत्नीचा ताेल गेला. तिला पडताना पाहून अनंत यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातच त्यांचाही ताेल गेला आणि दाेघांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पाेलीस पाटील, स्थानिक तरुण आणि गुहागरचे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दाेघांचेही मृतदेह बाहेर काढले.