अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध ठाणे न्यायालयाचे अटक वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:17 PM2019-11-18T22:17:23+5:302019-11-18T22:24:20+5:30
मारहाणीच्या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट ठाणे न्यायालयाने जारी केले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती दोन वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल तिच्याविरुद्ध वॉरंट तसेच एक हजारांचा दंडही भरण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याच्या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळीविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट ठाणेन्यायालयाने जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती दोन वेळा अनुपस्थित राहिल्याबद्दल तिच्याविरुद्ध वॉरंट तसेच एक हजारांचा दंडही भरण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली.
ठोशाबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा आरोप मनचंदा हिने केल्यानंतर प्राजक्ताविरुद्ध ५ एप्रिल रोजी ठाणे ग्रामीणमधील काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मनचंदा यांनी माळी हिच्याविरु द्ध ठाणे न्यायालयात तक्र ार दाखल केली होती. न्यायालयाने तक्र ार दाखल करून घेतली. शिवाय धमकीचेही कलम वाढविल्यामुळे प्राजक्ताच्या अडचणीत भर पडली. न्यायालयाने २६ जून रोजी समन्स बजावून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश तिला बजावले होते. समन्स घेऊन तिच्या घरी गेलेल्या पोलिसांनाही ती किंवा तिच्या घरातील कोणीही मिळाले नव्हते. जून महिन्यात याप्रकरणी न्यायाधीश व्ही.व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मात्र, प्राजक्ताने सुनावणीसाठी हजेरी न लावल्याने न्यायालयाने तिच्याविरुद्ध १ नोव्हेंबर २०१९ रोजी अटक वॉरंट जारी करून तिला एक हजारांचा दंडही ठोठावला. यासंदर्भातील एक सुनावणी १८ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयात होती. त्यावेळी मनचंदा हिचे वकील सचिन पवार यांनी ही माहिती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. बहाळकर यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भातील कोणतेही आदेश अद्याप आपल्यापर्यंत आलेले नाहीत. मात्र, न्यायालयीन नेमके काय आदेश आहेत, ते पाहून चौकशी केली जाईल, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.