कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणा-या आरोपीच्या कोठडीत वाढ : ठाणे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 06:41 PM2018-02-18T18:41:37+5:302018-02-18T18:45:24+5:30
कल्याणमधून गांजाची तस्करी करणा-या रिक्षा चालक अच्चूला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने विशेष काहीच माहिती दिली नाही. पोलिसांच्या मागणीनंतर ठाणे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
ठाणे : कल्याण परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या अच्चू ऊर्फ अब्दुल रशीद शेख (४५, रा. बैलबाजार, कल्याण) या रिक्षाचालकाला २० फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याचे विशेष न्या. व्ही.व्ही. बंबार्डे यांनी दिले आहेत. त्याच्याकडून ६० हजारांचा चार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याणच्या बैलबाजार जेठा कम्पाउंड परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अच्चूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने १३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडे मिळालेल्या चार किलोच्या गांजाच्या चौकशीसाठी न्यायालयाने सुरुवातीला त्याला १७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली. दरम्यान, त्याने हा गांजा कोणाकडून आणला? कोणाला विक्री करणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? तो कधीपासून हे काम करतो? अशा कोणत्याच प्रश्नांची त्याने चौकशीत उत्तरे दिली नाही. तपासात तो कोणत्याही प्रकारे तो सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्याच्या कोठडीची मुदत शनिवारी संपताच त्याला आणखी तीन दिवस म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.