रेमडेसिविर विकणाऱ्या तिघांचा जामीन ठाणे न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:28 AM2021-06-05T04:28:32+5:302021-06-05T04:28:32+5:30
ठाणे : बेकायदेशीररित्या रेमडेसिविर इंजेक्शन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ...
ठाणे : बेकायदेशीररित्या रेमडेसिविर इंजेक्शन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज शुक्रवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.पंढरीकर यांनी फेटाळला. आरोपी हे वैद्यकीय सेवेशी संबंधित असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोविड १९ या साथीच्या आजारावर काही प्रमाणात का होईना गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचे पाच नग हे बेकायदेशीररित्या आरोपींनी मिळविले होते. शिवाय, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परवाना नसताना छापील किमतीपेक्षा चढ्या दराने तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन आणि कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किमतीमध्ये बेकायदेशीररित्या बाळगून त्याची विक्री केली होती. याच प्रकरणात मीरा रोड पूर्व भागातून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर योगेश पवार, अस्मिता पवार, शीतल दीपक कडू आणि मोहम्मद इरफान बहाउद्दीन अन्सारी अशा चौघांना मे २०२१ मध्ये अटक केली होती. त्यापैकी योगेश, शीतल आणि मोहम्मद या तिघांनी जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. त्याच अर्जावर शुक्रवारी न्यायाधीश पंढरीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली; तर सरकारी वकील विजय मुंढे यांनी आरोपी हे वैद्यकीय सेवेशी निगडीत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याच आधारावर न्या. पंढरीकर यांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुहेल एफ. पठाण करीत आहेत.