ठाणे, भिवंडी परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालास अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: June 7, 2023 06:31 PM2023-06-07T18:31:19+5:302023-06-07T18:31:44+5:30
एका पिडित महिलेची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बुधवारी दिली.
ठाणे : ठाणे आणि भिवंडी परिसरात असहाय्य मुली तसेच महिलांना फूस लावून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेणाऱ्या एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पकाने अटक केली. त्याच्या तावडीतून एका पिडित महिलेची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बुधवारी दिली.
ठाणे, भिवंडी परिसरात पिडित असहाय्य मुली आणि महिलांना फूस लावून त्यांच्याकडून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच आधारे ६ जून रोजी भिवंडीतील कल्याण भिवंडी रोडवरील रांजणोली गावातील के. एन. पार्क हॉटेलसमोर एका बनावट गिर्हाईकाच्या मदतीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली जमादार श्रद्धा कदम, डी. व्ही. चव्हाण, एस. व्ही. सोननीस आणि डी. एस. मोहिते आदींच्या पकाने छापा टाकून एका दलालालास ताब्यात घेतले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शरीरविक्रयासाठी त्याने आणलेल्या महिलेचीही या पथकाने सुटका केली. त्याचे आणखी यात कोणी साथीदार आहेत का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.