ठाण्यात २० लाखांच्या इफेड्रीनसह एकाला अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 06:27 PM2018-07-24T18:27:54+5:302018-07-24T18:36:35+5:30
सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार याच्याकडून २० लाखांचे इफेड्रीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने सोमवारी रात्री हस्तगत केले. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे: सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार (२५, रा. पिंपळदरी, जि. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने मंगळवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास खारटन रोड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून २० लाखांचे अर्धा किलो सुड्रो इफेड्रीन जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील सिडको बस थांब्याजवळ इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी प्रविण पवार हा येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, अविराज कु-हाडे, अमोल वालझडे आणि संदीप बागूल आदींच्या पथकाने खारटन रोड परिसरात २३ जुलै रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सापळा लावला. त्यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या प्रविणला युनिट-१ च्या पथकाने कळवा नाक्याच्या दिशेने जाणा-या रोडवर कॅफे डाईन हॉटेलच्या समोरुन ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये अर्धा किलोची सुडो इफेड्रीन पावडरही हस्तगत करण्यात आली. पवार याच्याविरुद्ध मंगळवारी पहाटेपर्यंत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची कारवाई करण्यात आली. त्याला ठाणे न्यायालयाने ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. त्याने हे इफेड्रीन कुठून आणले? ते कोणाला विकले जाणार होते? त्याचे आणखी कोणते साथीदार यामध्ये आहेत? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.