भिवंडीतून ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केला ४३ लाखांचा गुटखा
By जितेंद्र कालेकर | Published: November 11, 2024 06:55 PM2024-11-11T18:55:59+5:302024-11-11T18:58:34+5:30
अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई: दोघांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भिवंडीतील वळगावमधील गोदामातून जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी सोमवारी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून ४३ लाख ६३ हजार ३७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थांची शोध मोहीम राबवून त्यावर कारवाईच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पाेलिस आयुक्त उगले, उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विराेधी पथकाने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी भिवंडीतील वळगाव भागातील पद्मावती कॉम्पलेक्समधील गोदाम क्रमांक जी- ४ मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहूल म्हस्के, सहायक पोलिस निरीक्षक जगदीश गावीत, उपनिरीक्षक दीपक किणी, राजेंद्र निकम आणि मोहन परब आदींच्या पथकाने धाड टाकून बोल्ट फिल्टर तंबाखू, विविध कंपन्यांचा पानमसाला आणि तंबाखू असा ४३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हा सर्व गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी अवैधरित्या साठवणूक केल्याचे चौकशीमध्ये आढळले. याप्रकरणी गुटख्याची साठवूणक करणारा राजेश मिश्रा ( रा. मुलुंड मुबई ) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमातील कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी आरोपी मिश्रा याला अटक केली आहे.