चोऱ्या करण्यासाठी यूपीतून दोघे यायचे नातेवाइकांकडे; मुंबई, ठाण्यात ११ महिलांचे दागिने पळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 06:19 AM2024-07-14T06:19:33+5:302024-07-14T06:20:53+5:30

आरोपींकडून १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती

Thane Crime Two used to come from UP to their relatives to steal | चोऱ्या करण्यासाठी यूपीतून दोघे यायचे नातेवाइकांकडे; मुंबई, ठाण्यात ११ महिलांचे दागिने पळवले

चोऱ्या करण्यासाठी यूपीतून दोघे यायचे नातेवाइकांकडे; मुंबई, ठाण्यात ११ महिलांचे दागिने पळवले

ठाणे : मुंबई, ठाणे, कल्याणमधील ११ महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आशिष कल्याण सिंग (३३) आणि अमितकुमार राकेश सिंग (२६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे चोऱ्या करण्यासाठी खास यूपीतून ठाण्यातील सावरकरनगर भागातील नातेवाइकांकडे राहण्यासाठी येत होते. या आरोपींकडून १० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.

चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरट्यांनी पोबारा केला होता. याबाबत गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे यांच्या पथकाने त्याचा तपास सुरू केला होता. यामध्ये घटनास्थळावरून आरोपी ज्या दिशेने पळून गेला, त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहणी केली. त्याआधारे पथकाने आशिष सिंग याला ताब्यात घेऊन चौकशी केली.  त्यात त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन अमितकुमार सिंगच्या मदतीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलिस पथकाला दिली. त्यानुसार पथकाने अमितकुमारचा शोध घेऊन त्याला बोरीवली येथून अटक केली. 

दाेघांना अटक, एकाचा शाेध सुरू

चोरी प्रकरणात रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा पथकाकडून शोध सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात दोघांनी चोरीचे ११ गुन्हे केल्याची बाब उघडकीस आली आहे. यामध्ये चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३, कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २, कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १, खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १, गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात आरोपींनी चोरलेले १२२ ग्रॅम वजनाचे ८ लाख ५४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि दोन दुचाकी असा १० लाख १४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
 

Web Title: Thane Crime Two used to come from UP to their relatives to steal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.