ठाण्याचा पारा चढला, ४१ अंश सेल्सीअसवर गेला पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 07:46 PM2020-04-20T19:46:22+5:302020-04-20T19:50:04+5:30
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे शहरातील तापमानातही आता वाढ होतांना दिसत आहे. ठाणे शहराचे तापमान आज ४१ अंश सेल्सीएसवर गेले होते. तर मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यात घरगुती वीजेच्या वापरातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ठाणे - ठाणेशहराच्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतांन दुसरीकडे ठाण्याचा पाराही आता वाढतांना दिसत असल्याचे चित्र आहे. सोमवारी ठाणे शहरात तापमानाने ४१ अंशाचा पारा पार केला होता. मागील काही वर्षात शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी वाढलेल्या तापमानाचा फारसा त्रास मात्र जाणवला नाही. कारण कोरोनामुळे नागरीक घरातच लॉक डाऊन असल्याने तेवढा पार चढतांना दिसला नाही. परंतु नागरीक घरी असल्याने वीजेचा वापर वाढल्याचे मात्र दिसत होते. त्यामुळे शुक्रवार पासून ठाण्यासह, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात अनेक भागात वीजेचा लंफडाव सुरु असल्याचे दिसत होते.
एकीकडे ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १५० च्या जवळ आली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे आता ठाण्यात उन्हाचा पाराही वाढतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांना उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यातही दुपारच्या वेळी तापमान वाढत आहे. या वाढत्या उष्माने नागरीक घरात बसून हैराण झाले आहेत. सोमवारी २० एप्रिलला दुपारी बारा पासून सायंकाळी पाच पर्यंत शहरात उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. ठाणे शहरात सोमवारी तापमानाने ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी शहरात ४१.०८ तापमानाची नोंद झाली. तर दिवसातील सर्वात कमी २८.०७ अंश सेल्सिअस तापमानाची सकाळी सात वाजता नोंद झाली. त्यानंतर दिवसभर तापमान सातत्याने वाढत होते. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने नागरिकांना घरीच थांबावे लागत आहे. त्यात या वाढत्या उष्माने ते अधिकच हैराण झाले होते.
दरम्यान वाढत्या उष्मामुळे घरात आता २४ तास फैन किंवा एसीचा वापर वाढू लागला आहे. तसेच वर्क फ्रॉम सुरु असल्यानेही घरगुती वीजेचा वापर वाढल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतांना दिसत होता. रविवारी नौपाडयातील वीज पुरवठा खंडीत होता. तर सोमवारी देखील शहरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसत होते. कळवा, मुंब्रा आणि दिव्यातही वीज पुरवठा खंडीत होत होता.