ठाणे : लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी; शिवाई नगर केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 03:42 PM2021-07-03T15:42:49+5:302021-07-03T15:44:52+5:30
Coronavirus Vaccine : लसी उपलब्ध नसल्यानं अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रं होती बंद. शनिवारी अनेक केंद्रांवर झाली होती गर्दी.
ठाणे : मागील काही दिवस लसीकरण उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र बंद होती. परंतु शनिवारी पुन्हा लसीकरण सुरु झाल्याने पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. तर शिवाई नगर भागात लसीकरणाच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे दिसून आले. अखेर येथे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले. परंतु या काळात लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावरही गर्दी होऊन तेथेही पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली होती.
मागील दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातच लसीकरण बंद होते. शुक्रवारी सांयकाळी लस प्राप्त झाल्यानंतर ठाण्याच्या विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच नागरीकांनी केंद्रावर बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने लसीकरण सुरु होते. त्यातही काही केंद्रावर लसी कमी आल्याने यात आणखी गोंधळ वाढल्याचे चित्र बहुतेक सर्वच केंद्रावर दिसत होते. त्यातही मागील काही दिवसापासून पालिकेच्या लसी घेऊन राजकीय मंडळींकडून त्या वाटप केल्या जात आहेत. मोफत मिळणाऱ्या लसींवरदेखील राजकीय मंडळींचे मार्केटींग सुरु असल्याचे चित्र शहरभर दिसत होते. त्यामुळेच अधिकचा गोंधळ होऊन काही ठिकाणी राजकीय मंडळींना नागरीकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान दुसरीकडे शिवाई नगर केंद्रावर देखील ऑफलाईन पद्धतीने लसीकरण सुरु होते. परंतु शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईनचे सर्वच बुकींग हाकेले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रांगेत उभ्या असलेल्यांना लस मिळत नव्हती. त्यामुळे याच मुद्यावर शिवसेनेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. त्यावरुन या ठिकाणी बराच वेळ गोंधळ उडाला होता. अखेर हा गोंधळ शांत होत नसल्याने पोलिसांनी पाचारण करावे लागले. त्यानंतर काही काळ हे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले.
पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु झाले. तर खासदार राजन विचारे यांनीदेखील शनिवारी मोफत लसीकरण ठेवले होते. त्याठिकाणी देखील थेट दोन किमी पर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. याठिकाणीदेखील मर्जीतील नागरिकांना आधी सोडले जात असल्याच्या मुद्यावरुन इतर नागरीकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे त्याठिकाणीदेखील पोलिसांनी पाचारण करावे लागले.
मोफतच्या लसीवर नगरसेवकांचे मार्केटिंग
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या राजकीय मंडळींना लस दिल्या जात आहेत. शासनाकडून मोफत लस उपलब्ध होत आहेत. त्याच लस या मंडळींना दिल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच नागरीकांना त्या मोफतच मिळणार आहेत. परंतु असे असेल तरी या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचे फलक मात्र शहराच्या विविध भागात लागल्याचे दिसून येत असून नगरसेवक तर या माध्यमातून स्वत:चे ब्रॅन्डींग करतांना दिसत आहेत.