संस्कृती, विकासाचे हेच ठाणे, मान्यवर ठाणेकरांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 03:38 AM2018-08-15T03:38:11+5:302018-08-15T03:38:25+5:30
जगण्यायोग्य शहरांच्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक प्राप्त केल्यामुळे ठाणेकरांमध्ये समाधानाची, आनंदाची भावना आहे. ठाणे हे संस्कृती, विकास, कला अशा अनेक क्षेत्रांचे ठाणे आहे.
- प्रज्ञा म्हात्रे
जगण्यायोग्य शहरांच्या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक प्राप्त केल्यामुळे ठाणेकरांमध्ये समाधानाची, आनंदाची भावना आहे. ठाणे हे संस्कृती, विकास, कला अशा अनेक क्षेत्रांचे ठाणे आहे. त्यामुळे देशभरातील दहा शहरांमध्ये ठाण्याचा नंबर लागला, याचे कौतुक असले तरी अप्रुप नाही. उलटपक्षी ठाण्याचा क्रमांक आणखी वरचा लागायला हवा होता, अशी भावना मान्यवर ठाणेकरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
माझ्या मनात ज्या ठाणे शहराचे स्थान अगदी पहिल्या क्रमांकावर आहे, ते शहर सहाव्या क्रमांकावर का जाते याचा शोध मी घेतला. साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या ठाणे हे विकासाचे ठाणे आहे. परंतु मुंबई, पुणे व नाशिक यांना जोडणारे, सुवर्ण त्रिकोणाच्या हृदयातले ठाणे वेगाने वाढताना त्या पटीने दळणवळण, वाहतूक, गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडीची समस्या सोडवली गेली नाही. ठाणेकर हा मुळात समजुतदार, सहिष्णु आहे. पण याच त्याच्या स्वभावामुळे लोकप्रतिनिधींनी ठाणेकरांना गृहीत धरले आणि हे टुमदार व गावपण जपलेले शहर हळुहळू बकाल होत गेले. अनेक प्रकारचे तलाव जे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात इतक्या संख्येने नाहीत, त्या तलावाने सुशोभित वाढणारे माझे लाडके ठाणे, भारतातले सुंदर शहर होऊ शकते. पण, तलावांची निळाई जपणे, परिसरांचा देखावा कल्पकतेने विकास करणे आवश्यक आहे. रस्ते व उत्सर्जनाची सार्वजनिक स्वच्छतालये यावर शहराचे आरोग्य अवलंबून असते. गर्दी व रहदारीसाठी सर्वोत्तम रस्ते बांधणे व स्वच्छतालये बांधल्यास ठाणे, पुढे प्रगती करु शकेल. ठाणे हे सणांचे ठाणे आहे. गणपती, नवरात्र, दहीकाला, गोकुळाष्टमी, दीपोत्सव हे सण इतक्या उत्साहाने कोठेही होत नसतील पण त्याचे रुपांतर ध्वनीप्रदूषण व जाहिरातींच्या विळख्यात होऊ नये ठाणे हे शांततेचे व मंदिरांचे शहर आहे. ते बगिच्यांचे आणि ग्रथांलयांचेही ठाणे व्हावे. ठाणेकरांना व लोकप्रतिनिधींना ठाणे पहिल्या क्रमांकावर या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
- प्रा. प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक
कमीत कमी प्रदूषण असलेल्या या शहराने हिरवाई जपली आहे आणि याचे श्रेय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना जाते. ते धडाडीचे आयुक्त आहेत. टी चंद्रशेखर यांच्यानंतर जयस्वाल यांचे कार्य कायम लक्षात राहील. व्हीजन समोर ठेवून त्यांनी शहरात कामे केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात डीजीटल क्रांती, रस्ता रुंदीकरण, ग्रीन झोन झाले आहेत. सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या हे शहर अतिशय चांगले आहे. सिग्नल शाळेसारखा एक चांगला उपक्रम ठाण्यात सुरू झाला. कदाचित, या सर्वांमुळेच की काय ठाणे सहाव्या क्रमांकावर आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. जगण्यासाठी योग्य असलेल्या या शहरात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. या शहरात मोठी रुग्णालये आहेत. विशेष म्हणजे या शहरातील पत्रकार अत्यंत जागरुक आहेत. एखादी समस्या असेल त्याला लगेच वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून वाचा फोडतात. एखाद्या गटाराचे झाकण उघडे असेल तरी त्याचा फोटो येतो आणि ते काम दोन तासांत होते. त्यामुळे पत्राकारांचाही या शहरात महत्त्वाचा वाटा आहे. - विजू माने, दिग्दर्शक
राहण्याच्या दृष्टीकोनातून ठाण्याने सहावा क्रमांक पटकावला हे एकदम परफेक्ट आहे. आणखीन वरचा क्रमांक यायला हवा होता. ठाणे हे मूळचे तलावांचे शहर आहे. इतर शहरांच्या तुलनेत येथे प्रदूषण कमी आहे. येथील राजकीय वातावरण चांगले नसले तरी जगण्यासाठीचे वातावरण मात्र योग्य आहे. नवीन लोकांसाठी चांगले कॉम्प्लेक्स येथे उभारले असून यात चांगल्या सुखसोयी आहेत. टी चंद्रशेखर यांच्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण केले ही चांगली बाब आहे, आता येथे मेट्रोही येतेय. केवळ धनिकांसाठी नव्हे तर झोपडीधारकांसाठीही चांगल्या इमारती उभारल्या आहेत. जागा घेण्याकरिता येथे खंडणी वसुली होत नाही.
-उल्हास प्रधान, आर्किटेक
ठाणे हे छानच आहे. पोखरणचा डोंगर आणि मुंब्रा येथील डोंगर यामध्ये ठाणे वसले आहे. तलावांबरोबर उद्याने असून या शहरात दर्जेदार संस्था आहेत, शैक्षणिकदृष्ट्या ठाणे पुढे आहे. येथे दोन नाट्यगृह, स्टेडीयम, स्पोर्टस अॅकॅडमीबरोबर विविध कलांचा संगम, गुरूशिष्याची परंपरा, नृत्याची घराणी आहेत. सांस्कृतिक शहर ही ओळख असल्याने बाहेरचे लोक या शहरात येत आहेत. शहराबाहेर गेलो की करमत नाही. येथे खाद्यसंस्कृती उत्तम आहे, मॉल्सही आहेत, राम मारुती रोड, गोखले रोड यांठिकाणी भरपूर दुकाने आहेत, त्यामुळे खरेदीसाठी शहराबाहेर जावे लागत नाही. भरपूर मंदिरे असल्याने धार्मिक संस्कृतीही टिकून आहे. ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे सुरू झाली आज ठाणे स्टेशनवर एक्सप्रेस थांबतात, मेट्रो येतेय, बुलेटही थांबेल. मोक्याच्या ठिकाणचे शहर असल्याने या शहराच्या चारही बाजूने कोठेही जाता येते. बुद्धीमान, संशोधक, आमच्यासारखे उद्योजक या शहरात आहेत. वाचनसंस्कृती येथे रुजली आहे, एटीएम ठिकठिकाणी आहेत त्यामुळे या शहरात काहीही कमी नाही. माझे ठाणे मला प्रिय आहे.
- रवींद्र प्रभुदेसाई
उद्योजक
देशात ठाणे शहर सहाव्या क्रमांकावर आले हे ऐकून, वाचून आनंद झाला आहे. अनेक मोहीमा या शहरात राबवल्या जात आहेत. प्लास्टिकमुक्त शहर ही चांगली मोहीम हातात घेतली आहे. ठाणेकरांनी या मोहिमेला प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा आहे. या शहरात आयटी हब तयार होत आहे. त्यामुळे नक्कीच रोजगार निर्मिती होईल. तसेच, डीजी ठाणे प्रकल्पाचा ठाणेकरांना फायदा होईल.
- रोहितभाई शहा, हॉटेल व्यावसायिक