ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्क्यांवर;८३८ जण परतले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:28 AM2020-05-27T01:28:43+5:302020-05-27T01:29:01+5:30
ठाणेकरांना मोठा दिलासा
ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर आले असून सोमवारपर्यंत ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच कालावधीत दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या आसपास आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कधी १०० ते कधी १५० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. परंतु, क्वॉरंटाइन केलेल्या रुग्णांच्या संख्येमुळेच बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे तीदेखील शहरासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागणार आहे.
शहरात आजघडीला दोन हजारांहून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून यातील ८३८ हून अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
घाबरण्याऐवजी काळजी घेण्याची गरज
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ठाणेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र ठाणेकरांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, परंतु सौम्य लक्षणे दिसत असतील, अशांना आता रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी घरीच उपचार घेण्याचा सल्ला महानगरपालिकेने दिला आहे. परंतु, झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.परंतु, मृतांमध्येही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांचे वय ६० हून अधिक आहे, ज्यांना इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.