‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

By संदीप प्रधान | Published: July 17, 2023 10:54 AM2023-07-17T10:54:01+5:302023-07-17T10:54:24+5:30

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

'Thane' Curry - BJP's 'Mission 152' new political setup for maharashtra | ‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

googlenewsNext

संदीप प्रधान, 
वरिष्ठ सहायक संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा भरभक्कम बहुमत प्राप्त करून देण्याकरिता लोकसभा निवडणुकीत ४५ जागांचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. मोदींचा करिष्मा आणि महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात भाजप यश मिळविणार, असा विश्वास त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. परंतु, भिवंडीतील शिबिरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेले ‘मिशन १५२’ हे लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमधील फेरमांडणीचे संकेत देणारे आहे.

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १५२ जागांचे मिशन पूर्ण होईल इतक्या जागा लढण्याकरिता दिल्या जातील. तेवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर २०१४ मधील आदित्य ठाकरे यांच्या ‘मिशन १५१’मुळे युती तुटली होती. मात्र, भाजप आपल्या मित्रांना अंतर न देता हे मिशन साध्य करेल. बावनकुळे यांचे मिशन व फडणवीस यांनी त्यावर केलेली मल्लिनाथी यात विसंगती आहे. हे दोन्ही साध्य कसे होणार, याबाबत साशंकता आहे. सर्वाधिक १०६ आमदार असूनही भाजपला प्रचंड तडजोड करायला लागल्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांमध्ये उमेद निर्माण करणे, हा हे मिशन जाहीर करण्यामागील हेतू असू शकतो. शिवाय आपल्याला १५२ जागा जिंकायच्या असून, २८८ जागांवर काम करायचे आहे म्हटले तर कार्यकर्त्याला समोर आव्हान दिसते. अन्यथा तीन पक्षांच्या सरकारमध्ये अर्धामुर्धा वाटा मिळणार असेल तर कार्यकर्ता हतोत्साहित होतो. त्यामुळे मिशन जाहीर करण्यामागे कार्यकर्त्याला चेतवणे, हा हेतू आहे हे उघड आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत अगोदरच्या १२२ आमदारांपैकी भाजपचे किमान ४२ उमेदवार हे मोदींचा करिष्मा व केंद्रात सत्ता असतानाही पराभूत झाले व नवे २६ आमदार विजयी झाले. मिशन १५२ साठी २०१९ मध्ये लढविलेल्या १६२ जागा अधिक दुसऱ्या क्रमांकाच्या ५२ जागांवर निवडणूक लढवावी लागेल.

दोन पक्षांचा संसार
समजा भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना १०० जागा देऊ केल्या तर ते दोघे इतक्या कमी जागा स्वीकारणार का? हा प्रश्न आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपला शिंदे व पवार यांच्यामध्ये जो जास्त उपयुक्त वाटेल त्याच्यासोबत युती करून कदाचित एकाला स्वबळ आजमावण्याकरिता मोकळे करण्याचा निर्णय भाजप घेऊ शकते.
भाजपच्या लोकसभेतील ‘मिशन ४५’शी विधानसभेतील ‘मिशन १५२’चा सूतराम संबंध नाही. उलटपक्षी विधानसभा निवडणुकीत दोन पक्षांचा संसार भाजपची परवड थांबवणारा ठरेल.

Web Title: 'Thane' Curry - BJP's 'Mission 152' new political setup for maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.