Thane: सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 28, 2023 05:50 PM2023-08-28T17:50:16+5:302023-08-28T17:51:29+5:30
Thane: आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली.
ठाणे - सायबर गुन्हयांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हे गुन्हे अब्रुनुकसानीपासून खुनापर्यंत घडत आहे. मोबाईलमधूनही गुन्हे घडत आहेत, आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्र आणि आम्ही सिद्ध लेखिका आयोजित महिलांचे हक्क व अधिकार याविषयीच्या जनजागृती सत्रात ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा गैरवापर होत जे गुन्हे घडतात त्याला सायबर गुन्हे म्हटले जाते. यात मुलींच्या फोटोंचे मॉर्फींग करणे, स्टॉकींग करणेपासून खुनापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. मॅट्रीमोनीसाईट्सवरुन फसवणूकीच्या अनेक घटना घडत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही महिलांना समानतेसाठी लढा द्यावा लागतोय ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. हुंडाबळीचे प्रमाण शहरी भागात कमी आहे. आता जोडप्यांमध्ये ॲडजेंस्टमेंट होत नसल्याने विवाह मोडण्याच्या घटना घडत आहे. शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. झटकन निर्णय घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला. आता विवाह करताना विचार करावा लागत आहे, स्वतंत्र जगण्याला प्राधान्य दिले जात आहे. घटस्फोटाबद्द्ल पुर्वी जाहीरपणे बोलले जात नव्हते, तेव्हा प्रमाण देखील कमी होते, परंतू आता घटस्फोटच्या घटना साधारण झाल्या आहेत.
घटस्फोटामागची पुर्वी असणारी कारणे आता बदलेली आहे. त्यामुळे आता दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन गरजेचे झाले आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याची यावेळी त्यांनी माहिती दिली.