Thane: नालेसफाईच्या कामातील कसूर खपवून घेतली जाणार नाही - आयुक्त अभिजीत बांगर
By अजित मांडके | Published: June 8, 2023 07:37 PM2023-06-08T19:37:33+5:302023-06-08T19:38:29+5:30
Thane Municipal Corporation: नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी २ जून रोजी उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या नाल्यांची पाहणी केली.
- अजित मांडके
ठाणे - उथळसर प्रभाग समिती मधील नालेसफाईची कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्याकडूनही वेळोवेळी उथळसर प्रभाग समितीतील विविध नाल्यांमध्ये नालेसफाई व्यवस्थित पद्धतीने होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत येथील ठेकेदारास नोटीसा काढून दंडही आकारण्यात आला होता. परंतु प्रभाग समितीमधील नालेसफाईचे काम अत्यंत असमाधानकारक होत असल्याचे व त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याबाबत कंत्राटदार यांना वेळोवेळी नोटीसांद्वारे वारंवार सूचित करण्यात आले होते व१ लाख १५ हजार इतका दंड आकारण्यात आला होता. परंतु तरी देखील सुधारणा न झाल्याने अखेर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्याला काळ्या यादीत टाकले आहे.
नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी २ जून रोजी उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या नाल्यांची पाहणी केली. या पाहणी संबंधित कंत्राटदार करीत असलेल्या नालेसफाईबाबत आयुक्तांनी तीव्र शब्दात नापसंती दर्शविली व सदर कंत्राटदारास काळ्या यादीत का टाकण्यात येवू नये याचा खुलासा मागविण्याचे निर्देश दिले होते, यानुसार संबंधितास ही नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीसी संदर्भात कंत्राटदाराने कोणताही समाधानकारक खुलासा सादर केलेला नाही, तसेच तो आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यामध्ये पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे मे. जे. एस इन्फ्राटेक या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय बांगर यांनी घेतला आहे व संबंधितास पुढील तीन वर्षाकरिता ठाणे महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.
या पाहणी दौऱ्यादरम्यान चांदीवाला कॉम्प्लेक्स ते एस.टी वर्कशॉप, के- व्हिला ते सरस्वती शाळा, साकेत ब्रीज खाडीमुख, कॅसल मिल ब्रीज ते आनंद पार्क ब्रीज येथील नाल्यामधील गाळ त्याच नाल्यात गोळा केलेला असून अद्याप बाहेर काढलेला नसल्याचे आढळले. ऋतु पार्क ते बी.एम.सी पाईपलाईन, बी.एम.सी पाईपलाईन ते श्याम अपार्टमेंट येथील नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू असल्याचे तर पंचगंगा ते साकेत रोड ब्रीज नालेसफाईचे काम अद्याप सुरू केले नसल्याचे आढळून आले.
तसेच ऋतुपार्क ते बी.एम.सी पाईपलाईप, ऋतुपार्क ते सर्व्हिस रोड लोखंडी पूल, वंदना बस डेपो, सेंट्रल कॉम्प्लेक्स महापालिका भवन गेट नं. ३, उथळसर प्रभाग समिती गेटजवळ, सेंट्रल मैदान, आर.टी. ओ. कार्यालयासमोर, ट्रॅफिक चौकी, उर्जिता हॉटेलजवळ, बाटा कंपाऊंड सर्व्हिस रोड, खोपट सिग्नल पदपथावर, कोलबाड, बँक ऑफ बडोदाजवळ, विशाल टॉवर, जाग माता मंदिर, सुमेर कॅसल सोसायटी गेट, गोकुळनगर, जरीमरी मंदिर, हरदास नगर सर्व्हिस रोड, पंचगंगा सोसायटी गेट, मखमली तलाव पदपथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते गीता सोसायटी पदपथ येथे नालेसफाई दरम्यान काढलेला चिखल व गाळ उचलला नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले असून काम असमाधानकारक असल्याबाबत कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
जून महिना सुरू असला तरी प्रत्यक्षात पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे पावसाआधीचा जो काही कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये १०० टक्के नालेसफाई पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, याबाबत कोणी कर्तव्यात कसूर केली तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यास महानगरपालिका मागे हटणार नाही असा गंभीर इशारा त्यांनी दिला.