ठाणे जि. प.च्या अध्यक्षा सुषमा लोणेंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:42 AM2021-05-11T04:42:53+5:302021-05-11T04:42:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा कोकण विभागीय आयुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : येथील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून आदेश झाल्यामुळे मी स्वखुशीने हा राजीनामा दिला, असे लोणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या तीन ते साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात अध्यक्षपदाच्या राजीनामा देणाऱ्या लोणे या शिवसेनेच्या तिसऱ्या महिला आहेत.
जिल्हा परिषदेवर शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. यात अध्यक्षपदी सेनेच्या लोणे अध्यक्ष होत्या. सर्वांना अध्यक्षपदाची संधी देण्यासाठी सहा महिन्यांच्या मुदतीवर लोणे यांना संधी मिळाली होती. या राजीनाम्यासाठी कोणाचाही दबाव माझ्यावर आला नाही. सहा महिन्यांच्या कार्यकाळापेक्षा कोरोनामुळे मला दहा महिने अध्यक्षपदी संधी मिळाली आहे. यास अनुसरून पक्षश्रेष्ठींकडून आदेश मिळाल्यानंतर मी स्वखुशीने राजीनामा दिला, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून पायउतार होणाऱ्या शिवसेनेच्या लोणे तिसऱ्या जि. प. सदस्या आहेत. उपाध्यक्षपदी मात्र शिवसेनेचे मुरबाड येथील सुभाष पवार कायम आहेत. ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत दाखल झालेले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी एसटी प्रवर्गाच्या महिला सदस्यांसाठी राखीव होते. यावेळी शहापूरच्या मंजूषा जाधव आणि भिवंडीच्या दीपाली पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या या अध्यक्षपदी कल्याणच्या विद्यमान अध्यक्षा लोणे यांना संधी मिळाली होती. आता पुढील सुमारे दीड वर्षांसाठी शिवसेनेकडून कोणत्या ओबीसी महिला सदस्यास अध्यक्षपदाची संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत.
- अंबरनाथ तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता
जिल्हा परिषदेच्या या सत्तेत शिवसेनेची सदस्य संख्या अधिक असल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सेनेच्या एसटी व ओबीसी महिलांना संधी मिळाली आहे. या पदासाठी शहापूर, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांना संधी मिळालेली आहे. आता अंबरनाथ तालुक्यातील ओबीसी महिलेला संधी मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.