ठाणे जि. प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:28+5:302021-05-29T04:29:28+5:30

येथील नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पाडली. या निवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासन अधिकारी तथा ठाणे ...

Thane Dist. W. Pushpa Borhade Patil of Shiv Sena unopposed as President | ठाणे जि. प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध

ठाणे जि. प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध

Next

येथील नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पाडली. या निवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासन अधिकारी तथा ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ‘लोकमत’ने २३ मे रोजी ‘ठाणे जि. प. अध्यक्षपदी पुष्पा बोऱ्हाडे पाटील’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. सुषमा लोणे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पद रिक्त होते.

२८ मे रोजी आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे बहुमत आहे. शिवसेेनेने सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपलाही सहभागी करून घेतल्याने येथे एकही विरोधी पक्ष शिल्लक नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील यांच्या उमेदवारीला हिरवी झेंडी दाखवताच त्यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जि.प.चे उपाध्यक्ष सुभाष पवार आदींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव आहे. त्यास अनुसरून बोऱ्हाडे यांची शिवसेनेने निवड केली आहे. याआधी गेल्या साडेतीन वर्षांत शहापूर, भिवंडी आणि कल्याणला अध्यक्ष पदाचा लाभ मिळालेला आहे. मुरबाडला सुभाष पवार यांच्या रूपाने सध्या उपाध्यक्ष पद आहे. या चार तालुक्यांना न्याय दिल्यानंतर अंबरनाथ तालुक्याला संधी देऊन बोऱ्हाडे यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अंबरनाथच्या चरगांव गटाचे नेतृत्व बोऱ्हाडे करतात. त्यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ अजून दीड वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे.

---------

कॅप्शन : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताना अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे पाटील. राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्हा परिषदेत स्वागत केले.

Web Title: Thane Dist. W. Pushpa Borhade Patil of Shiv Sena unopposed as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.