ठाणे जिल्ह्यात ४,५८५ मतदारांनी पार केली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:48 PM2021-03-01T23:48:02+5:302021-03-01T23:48:08+5:30
सर्वाधिक ७६३ मतदार डोंबिवलीत
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी नवीन मतदारयादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ६६ लाख ३७ हजार ६७९ मतदारांचा समावेश आहे. यातील चार हजार ५८५ ज्येष्ठ मतदार शंभरी पार केलेले आहेत. यापैकी सर्वाधिक ७६३ मतदार डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहेत.
जिल्ह्यातील काही महापालिकांच्या निवडणुका लवकरच हाती घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या मतदारांसाठी जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी वापरली जाणार आहे. यास अनुसरून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असता, त्यात ६६ लाख ३७ हजार ६७९ जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. यामधील ३६ लाख १० हजार ९३३ पुरुष मतदार असून ३० लाख २६ हजार २७२ महिला मतदारांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील या १८ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात चार हजार ५८५ ज्येष्ठ नागरी ९९ वर्षांपेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत. या ज्येष्ठ मतदारांमध्ये दोन हजार ३५३ पुरुषांसह दोन हजार २३२ शंभरी पार केलेल्या महिला आजपर्यंत मतदानाचा हक्क बजावत आहेत. या वयोवृद्ध मतदारांमध्ये सर्वाधिक मतदार डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ७६३ ज्येष्ठांचा या मतदारयादीत समावेश आहे.
या खालोखाल कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शंभरी पार केलेले मतदार अद्यापही मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी देत आहेत. या अंतिम मतदारयादीतही त्यांना मतदानाचा हक्क बहाल केलेला असून त्यांचे मतदान महत्त्वाचे मानले जाते.