भिवंडीच्या चिंबीपाडा परिसरातील खाजगी विहिरींच्या स्वच्छतेचे ठाणे जि.प.च्या सीईओंचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 06:40 PM2018-04-14T18:40:03+5:302018-04-14T18:40:03+5:30
दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच पसिरातील खाजगी विहिरींची स्वच्छता करण्याचे आणि मजुरांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आदेश
ठाणे : भिवंडीच्या चिंबीपाडा गावालगत वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना दोन दिवसांपूर्वी गॅस्ट्रोची लागण झाली. विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रो झालेल्या या मजुरांवर भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या ताफ्यासह रुग्णांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच पसिरातील खाजगी विहिरींची स्वच्छता करण्याचे आणि मजुरांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिले.
या गॅस्ट्रोच्या लागणमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांची भीमनवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपचारार्थ दाखल रु ग्णांची तब्येत सुधारत असल्याचा निर्वाळा येथील डॉक्टरांनी दिला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे, स्वच्छता व पाणीपुरवठा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानसी बोरकर, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते आदी उपस्थित होते. परिसरातील विहिरींमध्ये दूषित पाणी असल्याची जाणीव स्थानिक आरोग्य अधिका-यांना असणे अपेक्षित आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी घरोघर मेडिक्लोअरचे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र, जनजागृती व विहिरीतील दूषित पाण्याच्या माहितीअभावी पाणी प्यायल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये बोलले जात आहे.
चिंबीपाडा येथील वीटभट्टीवर जाऊन भीमनवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून त्यांनी दोन खाजगी विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर न करण्याची नोटीस वीटभट्टी मालकाला बजावली आहे. मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने खाजगी विहिरीतील पाण्याची स्वच्छता तत्काळ करण्याचे आदेश भीमनवार यांनी ग्रामपंचायतीला दिले. याशिवाय, वीटभट्टी कामगारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचेही त्यांनी आरोग्य विभागास सूचित केले. गॅस्ट्रोचा धोका इतर गावांना होऊ नये, याकरिता चिंबीपाडा वीटभट्टीसह आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक घरी आरोग्याची खबरदारी घेणारे मार्गदर्शनही त्यांनी उपस्थितांना केले.