ठाणे जिल्हा हगणदारीमुक्तीचा दावा खोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:02 AM2019-06-09T01:02:13+5:302019-06-09T01:02:27+5:30
ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे
बाळाराम भोईर
ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा व स्वच्छतेबाबत केंद्राने महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांक घोषित केल्याबद्दल शाबासकी मिळवली जात आहे. परंतु, या कौतुकास खरोखरच ठाणे जिल्हा पात्र नाही, असा माझा अनुभव आहे. जिल्ह्यात विविध कमिट्या आल्या की, रंगरंगोटी करायची, रस्ते धुवायचे आणि शौचालयांना रंग लावायचा, असे करून स्वच्छता केल्याचा देखावा करायचा. मात्र, प्रत्यक्षात स्वच्छता झालेलीच नाही. ठाणे जिल्ह्यातील वस्तुस्थिती वेगळीच आहे. जिल्ह्यात हजारो शौचालये बांधली. परंतु, ग्रामीण भागातील अनेक शौचालये आजही बंद आहेत. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईमुळे ही शौचालये बंद झाली आहेत. हजारो शौचालये अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक शौचालये नादुरुस्त आहेत. शासकीय कार्यालयांमधील शौचालये बंद आहेत. सार्वजनिक शौचालयांत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने कुणी तेथे पाऊल ठेवायला तयार नाही.
भिवंडी तालुक्यात यावर्षी एक हजार ९४४ वैयक्तिक शौचालये मंजूर झाली. त्यातील एक हजार ७०० लोकांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली. परंतु, या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही. २४४ शौचालये अपूर्ण, अर्धवट आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची आहे. घरातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे धोरण बंद पडले. पाणीटंचाईमुळे लोक शौचालयात जाण्यापेक्षा बाहेर उघड्यावर जाणे पसंत करतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये अजूनही ४५ टक्के लोक व मुख्यत्वे महिला उघड्यावर शौचासाठी जातात. तरीही, ठाणे जिल्हा हगणदारीमुक्त कसा म्हणता येईल. शौचालयांची स्थिती व ठिकठिकाणचे घाणीचे साम्राज्य याचा नेमका सर्व्हे केल्यास ‘स्वच्छता दर्पण’ हा किताब मिळण्याबाबत साशंकता निर्माण होईल.
(श्रमजीवी संघटनेचे महाराष्टÑाचे सरचिटणीस)
- शब्दांकन : सुरेश लोखंडे
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने केलेल्या मूल्यांकनात राज्यामध्ये ‘स्वच्छता दर्पण’मध्ये ठाणे जिल्ह्याने प्रथम स्थान प्राप्त केले असले, तरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गावखेड्यांमध्ये घाणीचे साम्राज्य आजही पाहायला मिळते. असे असताना जिल्हा स्वच्छ कसा? कागदोपत्री आकडेवारी सादर करून ‘स्वच्छता दर्पण’मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे किंवा कसे, असा संशय घ्यायला जागा आहे.