ठाणे जिल्हाधिकारी थोडक्यात बचावले
By admin | Published: April 9, 2017 02:31 AM2017-04-09T02:31:46+5:302017-04-09T02:31:46+5:30
बेकायदा रेतीउपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तीन दिवसांपासून धडाकेबाज कारवाई करणारे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, तहसीलदार किरण सुरवसे आणि अन्य २० कर्मचाऱ्यांचे
कल्याण : बेकायदा रेतीउपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरोधात तीन दिवसांपासून धडाकेबाज कारवाई करणारे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, तहसीलदार किरण सुरवसे आणि अन्य २० कर्मचाऱ्यांचे पथक कल्याण येथून शनिवारी दुपारी बोटीने डोंबिवली खाडीकिनाऱ्याची पाहणी करण्यासाठी निघाले असताना त्यांची बोट डोंबिवली रेतीबंदर येथे अचानक पाण्यात बुडू लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलास तातडीने कळवल्याने त्यांनी तेथे धाव घेऊन त्यांना वाचवले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह सगळ्यांचे प्राण वाचले आहेत.
डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांपासून कल्याण रेतीबंदरात मोठी कारवाई करण्यात आली. त्यात रेती, रेतीउपसा करणारी यंत्रसामग्री असा ७२ कोटींचा माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या बोटी, सक्शन पंप आदी गॅसकटरने तोडण्यात आले. तसेच महापालिकेच्या मदतीने जेटीही उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण खाडी परिसर सुशोभित केला जाणार आहे. त्यादृष्टीने ही कारवाई सुरू आहे. ती संपल्यानंतर कल्याण रेतीबंदर परिसरात मेरीटाइम बोर्डाकडून एक भिंत उभारली जाणार आहे.
दरम्यान, दुपारी माणकोली पुलाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री आले होते. या कार्यक्रमानंतर डॉ. कल्याणकर दुपारी कल्याण रेतीबंदरात आले. तहसीलदार व २० जणांच्या ताफ्यासह त्यांनी बोटीने प्रवास सुरू केला. ही बोट डोंबिवलीला कोपर खाडीच्या दिशेने निघाली. बोट खाडीच्या पाण्यात बुडू लागताच अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. जवानांनी तत्काळ खाडीमार्गे जिल्हाधिकाऱ्यांची बुडणारी बोट गाठून त्यांना वाचवले. यामुळे वेगवेगळ््या तर्कवितर्कांना उधाण आले. (प्रतिनिधी)
डोंबिवलीत आजपासून कारवाई
कल्याण रेतीबंदर येथील कारवाईनंतर आता रविवारपासून डोंबिवली येथील खाडी परिसरातील बेकायदा रेतीउपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.