मतदार यादी’ शुद्धीकरणासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हवे राजकीय पक्षांचे सहकार्य!
By सुरेश लोखंडे | Published: July 21, 2023 05:21 PM2023-07-21T17:21:45+5:302023-07-21T17:22:02+5:30
जिल्ह्यातील मतदार यादी शुध्दीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे.
ठाणे : जिल्ह्यातील मतदार यादी शुध्दीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. विधानसभानिहाय मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) ची नेमणूक करावी. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार ठाणे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करण्याची माेहीम आजपासून जिल्ह्यात हाती घेतली आहे.
यासाठी जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आपल्या स्तरावरून विस्तृत प्रमाणात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त नव मतदार, संभाव्य मतदार यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मयत, स्थलांतरित मतदारांची वगळणी करण्यासाठी विहित कार्यपध्दती अवलंबून कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. आपल्या सहकार्यामुळे भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो संपूर्णपणे यशस्वी होईल, असे शिनगारे यांनी स्पष्ट करून राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.