ठाणे जिल्हा परिषद निवडणूक, मतमोजणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:17 AM2017-12-14T11:17:47+5:302017-12-14T11:18:30+5:30
जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली.
ठाणे - जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. थोड्याच वेळात कल हाती येऊ लागतील. छाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसाठी ही निवडणूक झाली. त्यातील खोणी गटात काँग्रेसचा उमेदवार विनविरोध निवडून आला आहे.
त्याचबरोबर भिवंडी (४२ गण), शहापूर २८ गण), मुरबाड (१६ गण), कल्याण (१२ गण) आणि अंबरनाथ (८ गण) या पंचायत समित्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातील शेलार आणि कोलीवली या दोन गणांत चुकीच्या मतपत्रिका वाटल्या गेल्याने तेथे फेरमतदान होणार आहे. त्यामुळे या १०६ पैकी १०४ गणांचीच मतमोजणी पार पडणार आहे.
बुधवारी त्यासाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाले होते. भिवंडी तालुक्यातील काल्हेरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणीमारीमुळे ही निवडणूक चर्चेत आली होती.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात आल्यावर त्यावेळची जिल्हा परिषद विसर्जित झाली होती. त्यानंतर तेथे निवडणूक जाहीर झाली, पण कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मुद्दा आणि काही ग्रामपंचायतींच्या नगर पंचायती करण्याच्या मागणीवरून बहिष्कार घातल्याने ही निवडणूक पुढे गेली. नंतर न्यायालयीने वादामुळे ती लांबत गेली आणि आता जवळपास सव्वातीन वर्षांनी ती पार पडते आहे.
शिवसेनेला सोबत घेत आदिवासींचे राजकारण करणारे विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने त्यांचा पाठिंबा मिळवला. शिवाय रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट त्यांच्या सोबत आहे. भाजपाने आक्रमकपणे इतर पक्षांतील निवडून येण्याच्या क्षमतेते उमेदवार फोडल्याने अन्य पक्ष एकत्र आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जागावाटप केले. त्यांना काही ठिकाणी काँग्रेसने साथ दिली. कुणबी सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. रिपब्लिकन पक्षाचा सेक्यूलर गट त्यांच्यासोबत गेला. त्या पार्श्वभूमीवर या नव्या राजकीय समीकरणांना मतदार कसा प्रतिसाद देतात ते गुरूवारच्या मतमोजणीतून थोड्याच वेळात समजेल.
भाजपाचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण मतदार आणि शेतकरी नेमका काय कौल देतात यावर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणार आहे.