ठाणे जिल्हा तापाने फणफणला, तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:31 AM2019-11-05T00:31:53+5:302019-11-05T00:32:17+5:30

चार महिन्यांत ११ मृत्यू : आरोग्ययंत्रणा मात्र सुस्तावलेलीच

Thane district fever, fever died 11 patient | ठाणे जिल्हा तापाने फणफणला, तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण

ठाणे जिल्हा तापाने फणफणला, तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. प्रत्येक महिन्यात एक ना एक रुग्णाच्या साथीच्या आजाराने मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील सर्व महापालिका, गावपाड्यांतील नागरिक डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापाने फणफणत आहेत.जिल्ह्यात पावसाळ्याच्या जुलै ते आॅक्टोबर या काळात ११ जणांचा, तर जानेवारी ते जून या काळात दोन अशा १३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याविरोधात उपाययोजना कमी पडल्यामुळे या मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे
जिल्ह्यातील नगर परिषदा, काही महापालिकांमध्ये ठिकठिकाणी कचरा व त्याची दुर्गंधी, स्वच्छतेचा अभाव जीवघेणा ठरत आहे. रस्त्यांवरील खड्डे, तुंबलेली गटारे, रस्त्यासह त्यांच्या कडेला तुंबलेले पाणी, बांधकामांच्या ठिकाणची अस्वच्छता, पाण्याची डबकी आदींमुळे मलेरिया, डेंग्यूसह अन्य तापांचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आजही शहरांप्रमाणेच गावखेड्यांतही साथीच्या आजारांवरील औषधोपचारासाठी रुग्ण खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये (ओपीडी) रुग्णांची मोठी गर्दी असून बहुतांश सरकारी दवाखान्यांसह काही प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने, तेथे जाऊन जीव धोक्यात घालणे रुग्ण टाळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात एवढी भीषण स्थिती असतानाही आरोग्य यंत्रणेला त्याचे काहीएक सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

बदलापूरला मलेरियाचे सहा रुग्ण आॅगस्टमध्ये आढळले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. कल्याणच्या बैलबाजार परिसरात सप्टेंबरमध्ये मलेरियाचे ११ रुग्ण आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. अन्य तापाच्या नावाखाली कल्याण-डोंबिवलीत जुलै महिन्यात दोन वेळा साथ उद्भवली. त्यातील दोन रुग्ण दगावले आहेत. आरोग्य यंत्रणा दगावलेल्यांची नोंद करण्यापलीकडे अन्य उपाययोजना शोधण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत नऊ रुग्ण दगावले, उपाययोजनांचा अभाव
च्डेंग्यूचे सर्वाधिक नऊ रुग्ण आतापर्यंत दगावले आहेत. यातील जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांत सात तर त्या आधी दोघे दगावलेले असतानाही आरोग्ययंत्रणेला त्यावर उपाययोजना करणे अजूनही सुचले नाही. डेंग्यूमुळे दगावलेल्यांपैकी सर्वाधिक रुग्ण जुलै व आॅगस्टमध्ये प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या सहा रुग्णांपैकी सर्वाधिक ठाणे महा पालिकेच्या वर्तकनगरमधील १२ जणांना डेंग्यूचा तापाची लागण झाली असता त्यापैकी दोघांचा व कोपरीत दहापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

च्कल्याण-डोंबिवलीच्या रामबागमधील २६ रुग्णांतील एक, मीरा-भार्इंदरच्या काशिमीरा गावामधील १६ पैकी एक दगावला आहे. शहापूर तालुक्यातील आटगावमधील एक रुग्ण दगावला आहे. आॅक्टोबरमध्ये भिवंडीच्या दाभाडमधील आठ ताप रुग्णांमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर, मुरबाडमधील विधे-कोरावळे येथील १० रुग्ण या डेंग्यूच्या तापाचे आढळून आले. उल्हासनगरमध्ये जूनच्या दरम्यान चार रुग्ण आढळले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

च्जानेवारीत भिवंडी पालिकेच्या क्षेत्रातील सहा रुग्णांमधून एकाचा व मीरा-भार्इंदरमधील काशीगाव येथील वाडीमधील एक रुग्ण दगावला आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आरोग्य यंत्रणा सुस्तावली असून, ती केवळ मृतांची संख्या व त्यावरील कारणमीमांसा करण्यात व्यस्त आहे. डेंग्यूसदृश १०७ रुग्णांपैकी १४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. दगावलेल्या नऊ जणांचा डेंग्यू संशयित रुग्ण म्हणून आरोग्य यंत्रणा आपल्या निष्काळजीवर पांघरूण घालत असल्याचे बोलले जात आहे.

साथीच्या तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण

कल्याण : सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी जून ते आॅक्टोबर, अशा पाच महिन्यांमध्ये केडीएमसी हद्दीत साथीच्या तापाचे २२ हजार ८१३ रुग्ण आढळले आहेत. यात डेंग्यूचे ३५७ रुग्ण आहेत. असे असतानाही सर्वकाही नियंत्रणात असल्याचा दावा केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, हिवताप, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. महापालिकेसह शहरांमधील खाजगी रुग्णालयांमध्येही या आजारांचे रुग्ण उपचारासाठी येतात. यंदाच्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा आढावा घेता जून ते ४ नोव्हेंबरपर्यंत विविध तापांचे एकूण २२ हजार ८१३ रुग्ण आढळले आहेत.
केडीएमसीचे कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आवश्यक असा औषधांचा साठा उपलब्ध आहे. साथीच्या रुग्णांसाठी १० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या १३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत घरोघरी सर्वेक्षण, आजार होऊ नयेत, यासाठी जागृती, खाजगी रुग्णालय आणि प्रयोगशाळांना भेटी देणे, सर्वेक्षण व खाजगी रुग्णालयात आढळणाऱ्या रुग्णांच्या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणे आदी कार्यवाही सुरू असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे.
दरम्यान, सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्येही कमालीची वाढ होत आहे. यात आतापर्यंत दोघांचा बळीही गेला आहे. परंतु, आढळणारे रुग्ण हे संशयित असल्याचे केडीएमसीचे म्हणणे आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये ३५७ संशयित रुग्ण आढळल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ते देखील संशयितच आहेत. अद्याप त्यांच्याबाबतचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पावसाळा थांबताच डेंग्यूची लागण
च्पावसाळा थांबल्यावरच डेंग्यूची लागण होते. ऊन-पावसाचा सुरू असलेला खेळ, त्यामुळे वातावरणात झालेला बदल हा डेंग्यूचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरतो. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.

च्सध्या डेंग्यूचे आढळणारे रुग्ण हे संशयित आहेत. खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधला जात असून, एखाद्या रुग्णाची माहिती उपलब्ध झाल्यास तो राहत असलेल्या परिसरात जाऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाते, असेही आरोग्य विभागातर्फे
सांगण्यात आले.

Web Title: Thane district fever, fever died 11 patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.