वनराई बंधाऱ्यांच्या ४५ लाख गोण्यांसाठी ठाणे जि. प. चा महापालिकांकडे पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 06:46 PM2019-10-29T18:46:57+5:302019-10-29T18:53:02+5:30
जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती.
ठाणे : रब्बी हंगामासाठी व जनावरांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या करीता ठाणेजिल्हा परिषदेने जिल्ह्यात नदी, नाले व ओढ्यांच्या ओव्हळांवर वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. पण त्यासाठी लागणाऱ्यां ४५ लाख रिकाम्या गोण्यां प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाकडून जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, विकास आदींकडे सतत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती. यामुळे दरम्यानच्या काळात बंधारे बांधण्याऐवजी ग्राम सेवकांना केवळ बंधारा बांधण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली.आता ठिकाणांची निश्चिती झाली आहे. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या काही रिकाम्य गोण्यांव्दारे बंधारे बांधण्याचे काम युध्दपातळीने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लागणाऱ्यां रिकाम्या गोण्यां महापालिकां, विकासकांकडून मिळवण्यासाठी यंत्रणाही सज्ज केली आहे.
ग्रामीण भागातील जंगलांमध्ये ठिकठिकाणी बांधल्या जाणाऱ्यां वनराई बंधाऱ्यांसाठी ४५ लाख गोण्यांची गरज जिल्हा परिषदेला आहे. त्या प्राप्त करण्यासाठी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी महापालिका, नगरपालिका, विकासकांच्या भेटी घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. या दौऱ्यांमुळे त्यांना गोण्या मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याव्दारे लोक सहभागातून जिल्ह्यात सुमारे चार हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक हजार ५०० बंधाऱ्यांचे नियोजन आहे. तर भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यात प्रत्येकी २५० बंधारे बांधण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीच्या या सुटीनंतर जिल्हा परिषदेनेकडून बंधाऱ्यांचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.
या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्यां पाणी टंचाईला काही अंशी आळा घालणे शक्य होईल. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हात पंप आदींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. याशिवाय गुरूढोरं, वन्य पशूपक्षी आदीसाठी जंगलात पाण्याची उपलबधता होणार आहे. रब्बी व नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना भेंडी सारख्या पालेभाज्यांचे उत्पन्न या पाण्यामुळे घेणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागास नवसंजीवनी देणाऱ्यां या उपक्रमासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योंगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना , शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेण्याचे देखील नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.