ठाणे जिल्ह्याला मिळाल्या ३९,३०० कोविशिल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 09:03 AM2021-05-14T09:03:29+5:302021-05-14T09:04:27+5:30
ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.
ठाणे : एकीकडे लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्याने शासनाने तूर्तास १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला ब्रेक दिला आहे. त्यानुसार ठाण्यातही बुधवारी या वयोगटाचे लसीकरण बंद होते. त्यात आता जिल्ह्याला बुधवारी कोविशिल्डचा ३९ हजार ३०० लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. ४५ वयोगटापुढील नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस यातून दिला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात ४५ वयोगटापुढीलच लसीकरण मोहीम सुरू होती.
ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ठाण्यातला हा सावळा गोंधळ दूर करण्यासाठी महापालिकेने टोकन पद्धत बंद केली आहे. तसेच रोजच्या रोज कोणत्या केंद्रात किती लसी उपलब्ध आहेत, याची माहिती आदल्या दिवशी दिली जात आहे. त्यानुसार लसीकरणाच्या दिवशी ऑफलाइन रांगा लावून नागरिकांना लस घ्याव्या लागत आहेत. परंतु, त्यातही एखाद्या केंद्रावर ९० लसी असतील तर रांगेतील केवळ ९० नागरिकांनाच टोकन दिले जात आहे. उर्वरितांना घरी जाण्यास सांगितले जात आहे. तरीदेखील नागरिक पहाटे ५ पासूनच रांगेत उभे राहत आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या तुटपुंज्या साठ्यानंतर आता जिल्ह्याला पुन्हा ३९ हजार ३०० कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तो किती दिवस पुरविला जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिकेला ५०० ते ५ हजारपर्यंतचा साठा मिळाला.