ठाणे जिल्ह्याला मिळाला ७९ हजार ४४० लसींचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:42+5:302021-06-04T04:30:42+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. असे असले तरी या आजाराने मृत्यू होणाऱ्या ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. असे असले तरी या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. त्यातच अनेक दिवसांपासून जिल्ह्याला मिळणाऱ्या अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणदेखील थांबले आहे. अशातच जिल्ह्याला ७९ हजार ४४० लसींचा साठा उपलब्ध झाला असून यामध्ये चार हजार ४४० कोव्हॅक्सिन, तर ७५ हजार कोविशिल्ड लसींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. त्यामुळे कोरोनाबाधित होण्यापेक्षा लस घेऊन सुरक्षित होण्याकडे लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र शासनाकडून होणाऱ्या अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे अनेकदा लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले होते. मात्र, अपुऱ्या साठ्यामुळे तेदेखील थांबविण्यात आले. लसीकरणाचा साठाच अपुरा असल्याने लसीकरण केंद्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. विविध महापालिकांच्या ठिकाणी निम्यापेक्षा कमी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. त्या ठिकाणी नागरिकांची लसीकरणासाठी झुंबड उडत आहे. दरम्यान, जिल्ह्यात लसीकरण सुरू राहावे, यासाठी शासनाकडून मिळत असलेल्या तुटपुंज्या लसींच्या माध्यमातून केंद्रांची संख्या कमी जास्त करीत लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. त्यातच बुधवारी ठाणे जिल्ह्यासाठी ७९ हजार ४४० इतका लसींचा साठा उपलब्ध झाला असून, यामध्ये चार हजार ४४० कोव्हॅक्सिन तर, ७५ हजार कोविशिल्ड लसींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
चौकट :-
लसीकरण माहिती
जिल्हा कोव्हॅक्सिन कोविशिल्ड
ठाणे ग्रामीण - ९३० - १५,७५०
कल्याण डोंबिवली - ८४० - १४,२५०
उल्हासनगर - २२० - ३,७५०
भिवंडी - ३१० - ५,२५०
ठाणे मनपा - ९८० - १६,५००
मीरा भाईंदर - ४९० - ८,२५०
नवी मुंबई - ६७० - ११,२५०
....................................................................................
एकूण - ४,४४० - ७५,०००