ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:45 AM2018-01-15T00:45:26+5:302018-01-15T00:45:35+5:30
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गतवर्षात झालेला शिकावू डॉक्टरांवरील हल्ला, त्यातच वाढलेल्या चोरीच्या आणि गर्दुल्ल्यांच्या घटनेनंतर रुग्णालयाला खाजगी सुरक्षारक्षक मिळावे
ठाणे : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गतवर्षात झालेला शिकावू डॉक्टरांवरील हल्ला, त्यातच वाढलेल्या चोरीच्या आणि गर्दुल्ल्यांच्या घटनेनंतर रुग्णालयाला खाजगी सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणी त्या वर्षात लावून धरली होती. मात्र, अजूनही न मिळाल्याने रविवारी नवजात बाळाचे अपहरण झाल्याचा आरोप होत आहे.
गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी सुरुवातीपासूनच अवघे चार सुरक्षारक्षक होते. त्यातील दोन सुरक्षारक्षक निवृत्त झाले असून सद्य:स्थितीत दोनच सुरक्षारक्षक रुग्णालयात कार्यरत असून ते सुरक्षारक्षक दोन शिफ्टमध्ये महिला प्रसूती वॉर्ड येथेच तैनात असतात. त्यातील एक जण आजारी असल्याने एकावर तेथील सुरक्षेची जबाबदारी आहे. तो शनिवारी सकाळची ड्युटी करून गेल्यावर रात्रीच्या वेळेस तेथे कोणीही सुरक्षारक्षक नव्हते. रुग्णालयाच्या गेटपासून रुग्णालयाचा परिसर सुरक्षारक्षकांविना असलेल्या संधीचा फायदा उचलून त्या बाळाचे अपहरण झाल्याचा आरोप केला जात आहे.
मध्यंतरी, रुग्णालयाच्या आवारात गर्दुल्ले आणि मद्यपींचे प्रमाण वाढले होते. त्यातच, बाह्यरुग्ण विभागाच्या काउंटरवरून ४१ हजार ७५५ रु पयांची रोकड चोरीला गेली होती. त्या वेळी, चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेºयाची दिशा फिरवून ठेवल्याचेही तपासात पुढे आले आहे. तत्पूर्वी रुग्णालयातील विविध विभागांत चोरीच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. मात्र, ते पकडले न गेल्याने चोरीचे प्रकार वाढले होते. यातच, २०१७ च्या एप्रिल महिन्यात उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णासह त्याच्या नातेवाइकांनी शिकावू डॉक्टरांना मारहाण केली होती. तेव्हाही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याचदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने ५० सुरक्षारक्षकांची गरज असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देत सुरक्षारक्षक मिळावे, अशी मागणीही केली होती. मात्र, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन ते अडीच वर्षांपूर्वी रुग्णालयात खाजगी सुरक्षारक्षक तैनात होते. परंतु, त्यांचा पगार वेळेवर न निघाल्याने त्या सुरक्षारक्षकांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर, अवघ्या दोनच सुरक्षारक्षकांवर रुग्णालयाच्या मुख्य गेटपासून सर्वच विभागांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही सुरक्षारक्षक मिळत नाही; परंतु रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षेसंदर्भात पोलिसांकडून सुरक्षा आॅडिट करावे, असे वरिष्ठ पातळीचे आदेश आहे. त्यामुळेच मिळणारे सुरक्षारक्षक पोलिसांच्या
आॅडिटमध्येच अडकल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.